पाकिस्तानची कारवाई; मसूद अझरच्या भावासह 44 दहशतवाद्यांसह अटक, मालमत्ता जप्त

ज्या दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे, अशा संघटनांच्या 44 सदस्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे.

JeM chief Masood Azhar (Photo Credits: PTI)

पाकिस्तानने आतापर्यंत नेहमीच दहशतवादाला थारा दिला आहे, मात्र कधीही ही गोष्ट मान्य केली नाही. मात्र पुलवामा (Pulwama) हल्ल्यानंतर या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर जगभरातील राष्ट्रांकडून वाढत असलेल्या दबावामुळे अखेर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ज्या दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे, अशा संघटनांच्या 44 सदस्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. यामध्ये मसूद अझहर (Masood Azhar) चा भाऊ मुफ्ती अब्दुर रऊफ (Mufti Abdur Rauf) उर्फ हमदाचाही समावेश आहे. मसूदचा मुलगा हम्झा अझरलाही ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानचे मंत्री शहरयार खान अफ्रिदी यांनी पत्रकारपरिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली.

खान यांनी कोणाच्याही दबावाला बळी पडता ही कामगिरी केली नसल्याचे सांगितले आहे. तसेच बंदी घातलेल्या सर्व संघटनांवर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. संघटनांवर कारवाई संदर्भात संयुक्त राष्ट्रांचे काही निकष आहेत त्यासंदर्भात एक कायदा सोमवारी पाकिस्तानच्या संसदेत मंजूर करण्यात आला. तसेच, ‘इथून पुढे, सर्व प्रकारच्या (प्रतिबंधित) संस्थांची मालमत्ता ही सरकारच्या नियंत्रणात असेल’ असे एफओचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी सांगितले. (हेही वाचा: ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मसूर अझहर याच्या मृत्यूचे वृत्त खोटे; मसूर जिवंत असल्याच्या कुटुंबाचा दावा)

दरम्यान पुलवामानंतर दहशतवादी संघटना समुद्रमार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे नौदल प्रमुख सुनिल लांबा यांनी म्हटले आहे. यासाठी पाकिस्तानच त्यांना मदत करत आहे पैसा पुरवत आहे असेही त्यांनी सांगितले. मात्र आता यूएनएससी (UNSC)च्या दबावानंतर पाकिस्तानने उचलले हे पाऊल महत्वाचे ठरत आहे.