Imran Khan Addresses Nation: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला केले संबोधित; म्हणाले- 'मी राजीनामा देणार नाही, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार' (Watch Video)
इम्रान खान यांनी त्यांच्या सरकारच्या विरोधात ‘आंतरराष्ट्रीय षड्यंत्र’ म्हणून उल्लेख केलेल्या पत्राचा हवाला देऊन राजकीय पक्षांविरुद्ध मतदान आणि तपासावर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.
देशातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी आज जनतेला संबोधित केले. यावेळी इम्रान यांनी भारत आणि काश्मीरचा उल्लेख करून अमेरिकेच्या हस्तक्षेपाबाबतही भाष्य केले. यावेळी बोलताना आपण झुकणार नाही असे ते म्हणाले. भाषणादरम्यान इम्रान खान भावूक दिसले. पाकिस्तान, देशातील राजकारण, पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण, अमेरिकेबतचे संबंध याबद्दल त्यांनी चर्चा केली. आपल्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी इम्रान म्हणाले, 'माझ्याकडे सर्व काही होते. आजही मला कशाचीच कमतरता नाही. स्वतंत्र पाकिस्तानात जन्मलेली मी पाकिस्तानची पहिली पिढी आहे.’
ते म्हणाले, 'मी राजकारणात प्रवेश केला कारण मी या निष्कर्षावर आलो होतो की, अल्लामा इक्बाल यांनी ज्या देशाचे स्वप्न पाहिले होते आणि ज्यासाठी कायदे आझम यांनी प्रकृती अस्वास्थ्यामध्येही लढा दिला तो पाकिस्तान कधीही होऊ शकत नाही. इस्लामिक कल्याणकारी राज्य बनणे हा पाकिस्तानचा मुख्य उद्देश होता. मी राजकारणाला सुरुवात केली तेव्हा माझ्या पक्षाच्या जाहीरनाम्यात तीन गोष्टींचा समावेश केला होता. पहिला न्याय, म्हणजे कायदा हा सामर्थ्यवान आणि दुर्बलांसाठी समान आहे. दुसरे- मानवता, कारण इस्लामिक राज्यात दया आहे आणि तिसरी गोष्ट- स्वाभिमान, कारण मुस्लिम राष्ट्र गुलाम असू शकत नाही.'
ते म्हणाले, ‘पाकिस्तानचा अर्थ काय, तर याचा अर्थ तुम्ही फक्त देवाला घाबरता. मी पाकिस्तानला खाली येताना पाहिले आहे. त्याचा अपमान होताना पाहिले आहे. माझ्या समाजाला मी गुलाम होऊ देणार नाही, असे मी नेहमी म्हणालो. आमचे परराष्ट्र धोरण मुक्त असेल. ते पाकिस्तानसाठी असेल. ते कोणाच्या विरोधात असेल असे नाही. ज्या अमेरिकेने आमच्यावर निर्बंध लादले, त्याच अमेरिकेला आम्ही सर्वाधिक पाठिंबा दिला.’
राष्ट्राला संबोधित करताना इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'माझी विचारसरणी भारतविरोधी नाही. काश्मीरमधील कलम 370 रद्द झाल्यावरच मी आक्षेप घेतला.’ यापूर्वी इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये त्यांच्या सरकारविरोधात विरोधकांच्या जमावबंदीदरम्यान भारतीय परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले होते. आजच्या भाषणादरम्यान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सरकारविरोधात 'परकीय षडयंत्र' असल्याची भीती व्यक्त केली. मी राजीनामा देणार नाही आणि शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून अशावेळी भाषण केले, जेव्हा तीन दिवसांच्या तहकूबनंतर आज (गुरुवार, 31 मार्च) नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन इम्रान खान यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाले. त्यानंतर काही मिनिटांतच सभागृहाचे कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले. (हेही वाचा: श्रीलंकेमध्ये स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट; दुध 263 रुपये लिटर, तांदूळ 500 रुपये किलो)
राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर एका महत्त्वाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान केले. नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील मतदानावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इम्रान खान यांनी त्यांच्या सरकारच्या विरोधात ‘आंतरराष्ट्रीय षड्यंत्र’ म्हणून उल्लेख केलेल्या पत्राचा हवाला देऊन राजकीय पक्षांविरुद्ध मतदान आणि तपासावर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.