Illegal Indian Call Centres: भारतामधील अवैध कॉल सेंटर्सनी अमेरिकन नागरिकांची केली अब्जावधींची फसवणूक; FBI ने सुरु केली कारवाई
अनेक अमेरिकन लोकांनी फसवणूक कॉलद्वारे 2022 मध्ये आतापर्यंत एकूण $10.2 अब्ज गमावले आहेत, जे 2021 च्या $6.9 अब्जच्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढले आहे.
भारतासाठी एक लाजिरवाणी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या तपास संस्थेने (FBI) उघड केले आहे की, भारतात कार्यरत असलेल्या अवैध कॉल सेंटर्स (Illegal Indian Call Centres) आणि फिशिंग टोळ्यांनी गेल्या दोन वर्षांत अमेरिकन नागरिकांची जवळजवळ 10 बिलिअन डॉलर्सची फसवणूक केली आहे. ही रक्कम अंदाजे अनेक राज्यांच्या अर्थसंकल्पाच्या बरोबरीची आहे. एफबीआयच्या म्हणण्यानुसार, यामध्ये गेल्या दोन वर्षांत 3 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त वृद्ध अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे.
अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणातील मोठ्या टेक फसवणुकीनंतर अमेरिकन तपास यंत्रणेने कारवाई सुरु केली आहे. गेल्या वर्षी या फसवणुकीत मोठी उडी पाहायला मिळाली. अमेरिकेमध्ये 2022 मध्ये फसवणुकीच्या अनेक घटनांची नोंद झाल्यानंतर, एफबीआयने आता नवी दिल्लीतील यूएस दूतावासात कायमस्वरूपी प्रतिनिधी नियुक्त केला आहे. भारताला जगासमोर बेकायदेशीर कॉल सेंटर्सचे केंद्र म्हणून प्रदर्शित करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी हा प्रतिनिधी सीबीआय, इंटरपोल आणि दिल्ली पोलिसांसोबत जवळून काम करेल.
अनेक अमेरिकन लोकांनी फसवणूक कॉलद्वारे 2022 मध्ये आतापर्यंत एकूण $10.2 अब्ज गमावले आहेत, जे 2021 च्या $6.9 अब्जच्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढले आहे. एफबीआयचे दक्षिण आशिया प्रमुख सुहेल दौड यांनी प्रकाशनाला सांगितले की, 2021 मध्ये 8,000 कोटी रुपये आणि 2022 च्या शेवटच्या 11 महिन्यांत 8,000 कोटी रुपयांच्या ‘रोमान्स-संबंधित’ फसवणूक झाल्या. ‘टेक सपोर्ट’ गुन्ह्यांमुळे झालेले नुकसान $3 अब्ज इतके होते. अशाप्रकारे भारतीय घोटाळेबाजांनी गेल्या 11 महिन्यांत 10.2 अब्ज डॉलर्सची फसवणूक केली. (हेही वाचा: Kanpur SBI Theft News: एसबीआयमध्ये फिल्मी स्टाईल चोरी, बोगदा खणून लांबवले 1.8 किलो सोने)
दौड यांनी सांगितले की, 'हा अद्याप राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नसू शकतो, परंतु (एखाद्या देशाची) प्रतिष्ठा यात गुंतलेली आहे, आणि त्याबाबतीत भारतावर जागतिक स्तरावर नामुष्कीची वेळ येऊ नये असे आम्हाला वाटते.’ त्यांनी असेही नमूद केले की, एफबीआयच्या वेबसाइटवर 2021 मध्ये 8.5 लाख तक्रारी आणि 2022 मध्ये आतापर्यंत 7.8 लाख तक्रारी इंटरनेट गुन्ह्यांसंदर्भात नोंदवण्यात आल्या आहेत.