Hamza Bin Laden is Alive: दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा जिवंत; अफगाणिस्तानमध्ये करतोय Al Qaeda चे नेतृत्व, अहवालात मोठा खुलासा

तालिबानविरोधी लष्करी संघटना द नॅशनल मोबिलायझेशन फ्रंट (एनएमएफ) ने देखील हमजा आणि त्याच्या साथीदारांची माहिती देणारा अहवाल तयार केला आहे.

Hamza Bin Laden (संग्रहित संपादित प्रतिमा)

Hamza Bin Laden is Alive: अमेरिकेत 9/11 चा हल्ला करणारा जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या (Osama Bin Laden) मुलाबाबत मोठा खुलासा झाला आहे. ओसामाचा मुलगा हमजा बिन लादेन () अजूनही जिवंत असून तो अफगाणिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व करत असल्याचा दावा अमेरिकन वृत्तपत्र द मिररच्या अहवालात करण्यात आला आहे. अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की, हमजाच्या आदेशानुसार, अल कायदा पुन्हा एकत्र येत आहे आणि पाश्चात्य लक्ष्यांवर भविष्यात हल्ले करण्याची तयारी करत आहे.

द मिररने दिलेल्या माहितीनुसार, अहवालात म्हटले आहे की, हमजा त्याचा भाऊ अब्दुल्ला बिन लादेन याच्यासोबत अफगाणिस्तानमध्ये गुप्तपणे अल कायदा संघटना चालवत आहे. तालिबानविरोधी लष्करी संघटना द नॅशनल मोबिलायझेशन फ्रंट (एनएमएफ) ने देखील हमजा आणि त्याच्या साथीदारांची माहिती देणारा अहवाल तयार केला आहे. ‘प्रिन्स ऑफ टेरर’ म्हणून ओळखला जाणारा माणूस उत्तर अफगाणिस्तानमध्ये 450 स्निपरच्या सतत संरक्षणाखाली लपला आहे, असे आउटलेटने म्हटले आहे.

अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की, 2021 मध्ये काबूलच्या पतनानंतर अफगाणिस्तान हे ‘विविध दहशतवादी गटांचे प्रशिक्षण केंद्र’ बनले आहे. हमजा बिन लादेनला दारा अब्दुल्ला खेल जिल्ह्यात (पंजशीर) नेण्यात आले आहे, जेथे 450 अरब आणि पाकिस्तानी त्याचे संरक्षण करत आहेत. अशाप्रकारे, 2019 च्या यूएस एअर स्ट्राइकमध्ये हमजा मारला गेल्याच्या दाव्याचे अहवालाने खंडन केले आहे. (हेही वाचा: Sharia Law in Afghanistan: महिलांनी व्यभिचार केल्यास त्यांना दगडाने ठेचून ठार मारले जाईल; तालिबान नेता अखुंदजादाची घोषणा)

ओसामाच्या हत्येनंतर अल कायदाच्या कारवाया हाती घेणाऱ्या आयमान अल-जवाहिरीसोबत हमजाने जवळून काम केल्याचे मानले जाते. अमेरिका आणि इतर देशांवर हल्ले करण्याचे आवाहन करणारे ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश समोर आल्यानंतर हमजाच्या हत्येची बातमी समोर आली. बीबीसीच्या एका जुन्या वृत्तानुसार, हमजाच्या मृत्यूचे ठिकाण आणि तारीख स्पष्ट झालेली नव्हती. पेंटागॉननेही या विषयावर भाष्य केले नाही.

ओसामाचा मुलगा हमजा बिन लादेन याला अमेरिकेने अधिकृतपणे जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते आणि तो इराणमध्ये नजरकैदेत असल्याचे मानले जात होते. मात्र 2019 मध्ये हमजा बिन लादेनचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला, असे अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले होते. हमजाचे वडील ओसामा बिन लादेन याला 2011 मध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद येथील एका कंपाउंडमध्ये अमेरिकन स्पेशल फोर्सने ठार केले होते. ओसामाने 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर केलेल्या हल्ल्यांना मंजुरी दिली होती, ज्यात सुमारे 3,000 लोक मारले गेले होते.