काय सांगता? महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म; Guinness World Record मध्ये होणार नोंद- Reports
आधीच जुळ्या मुलांची आई असलेल्या गोसीयाम थमारा सिथोले (Gosiame Thamara Sithole- 37) हिने सोमवारी उशीरा प्रिटोरिया येथील रुग्णालयात सीझेरियनद्वारे सात मुले व तीन मुलींना जन्म दिला
मागच्या महिन्यात मोरोक्कोमधील एका महिलेने एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली होती. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेमधील एका महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याचा दावा केला जात आहे. जर या घटनेची डॉक्टरांनी पुष्टी केली तर ही महिला आतापर्यंत एकाचवेळी सर्वात जास्त मुलांना जन्म देणारी महिला ठरेल. आधीच जुळ्या मुलांची आई असलेल्या गोसीयाम थमारा सिथोले (Gosiame Thamara Sithole- 37) हिने सोमवारी उशीरा प्रिटोरिया येथील रुग्णालयात सीझेरियनद्वारे सात मुले व तीन मुलींना जन्म दिला, असे तिच्या नवऱ्याने सांगितले आहे.
डेली मेलने याबाबत वृत्त दिले आहे. सध्या बेरोजगार असलेला गोसीयामचा नवरा टेबोगो त्सोतेसी (Tebogo Tsotetsi) ने सोमवारी रात्री पत्रकारांना सांगितले की ही गोष्ट 'आनंदी' आणि 'भावनिक' आहे. ही महिला मुळची एकुरहुलेनी महानगरपालिका नगरातील थेंबिसा टाउनशिप येथील आहे. आफ्रिका न्यूजच्या वृत्तानुसार, आधी डॉक्टरांना स्कॅनमध्ये दोन मुले दिसली नव्हती त्यामुळे या जोडप्याला 8 मुलांची अपेक्षा होती. मात्र आत्ता गोसीयामने 10 मुलांना जन्म दिला आहे. मुलांना जन्म देताना ती 7 महिने, 7 दिवसांची गरोदर होती. माहितीनुसार, सर्व मुले व्यवस्थित असून, त्यांना घरी घेऊन जाण्यापूर्वी पुढील काही महिने इनक्यूबेटरमध्ये ठेवावे लागेल. (हेही वाचा: महिलेने एकावेळी दिला 9 मुलांना जन्म; जाणून घ्या कोठे घडली 'ही' अनोखी घटना)
याबाबतची पुष्टी झाल्यावर गोसीयाम थमारा सिथोलेच्या नावावर एकाचवेळी सर्वात जास्त मुलांना जन्म देणाऱ्या महिलेचा विक्रम असेल. दरम्यान, द इंडिपेन्डंटच्या म्हणण्यानुसार1970 च्या दशकात पहिली नऊ मुलांना जन्म दिल्याची नोंद झाली होती. ही घटना सिडनीमध्ये घडली होती, परंतु दुर्दैवाने एकही बाळ वाचले नाही. 1999 मध्ये, मलेशियामध्ये झुरिना मॅट सद नावाच्या महिलेने 9 मुलांना जन्म दिला होता, परंतु त्यापैकी कोणीही सहा तासांपेक्षा जास्त काळ जगले नाही. जानेवारी 2009 मध्ये, नाद्य सुलेमानने कॅलिफोर्नियाच्या रुग्णालयात सहा मुले आणि दोन मुलींना जन्म दिला होता.