Global Food Crisis: जगभरात अन्नधान्य किमतींमध्ये वाढ, विविध देशांकडून निर्यातीवर निर्बंध
कोविड-19 महामारी आणि त्यानंतर उद्भवलेली स्थिती, जगभरात अनेक ठिकाणी सुरु असलेली युद्धं, युद्धजन्य स्थिती, हवामान बदल, वाढती महागाई, चलनफुगवटा आणि इतर अनेक गोष्टींमुळे अन्नधान्यांची टंचाई (Global Food Crisis) उद्बवू लागली आहे.
कोविड-19 महामारी आणि त्यानंतर उद्भवलेली स्थिती, जगभरात अनेक ठिकाणी सुरु असलेली युद्धं, युद्धजन्य स्थिती, हवामान बदल, वाढती महागाई, चलनफुगवटा आणि इतर अनेक गोष्टींमुळे अन्नधान्यांची टंचाई (Global Food Crisis) उद्बवू लागली आहे. परिणामी जगभरातील अनेक देशांनी आयातीवर भर दिला असला तरी, अन्नधान्यात स्वयंपूर्ण असलेल्या देशांनी निर्यातीवर नियंत्रण घातले आहे. सहाजिकच खुलेआम आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या निर्यातीवर मोठी बंदी आली आहे.
न्यूयॉर्क टाईम्स (New York Times) ने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील अनेक देश सावध पावले टाकत आहेत. त्यासाठी जवळपास 43 प्रकारचे संरक्षणात्मक उपाय राबविले जात आहेत. यामध्ये रशिया आणि त्याचा सहयोगी बेलारूस यांनी घातलेल्या निर्बंधांसह इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर घातलेली बंदी आणि खत निर्यातीवर चीनची बंदी यांचा समावेश आहे.
भारतानेही हवामानातील बदल विचारात घेऊन गहू नर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे जगभरातील गव्हाच्या किंमती वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेन हे गव्हाचे सर्वात मोठे निर्यातदार म्हणून ओळखले जातात. मात्र, रशिया- युक्रेन युद्धामुळे जगभरातील अनेक देशांना गहू मिळविण्यासाठी इतर देशांवर विसंबून राहावे लागते आहे. भविष्यात ही स्थिती अशीच राहिली तर अन्नधान्याच्या किमती आणखी वाढत राहतील, असे ग्रो इंटेलिजन्सच्या वरिष्ठ संशोधन विश्लेषक केली गौगरी यांनी म्हटले आहे.