मोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

इराकमध्ये मोसूल शहराजवळील टिग्रीस नदी (Tigris River) मध्ये एक फेरीबोट उलटून झालेल्या अपघातात तब्बल 100 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.

टिग्रीस नदी (Photo Credit : Youtube)

इराकमधील विध्वंस झालेले दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर मोसूल (Mosul) आता कुठे सुधारण्याच्या मार्गावर असताना, एक मोठी दुर्घटना या शहरात घडली आहे. शहराजवळील टिग्रीस नदी (Tigris River) मध्ये एक फेरीबोट उलटून झालेल्या अपघातात तब्बल 100 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. देशात कुर्दिश नववर्ष साजरा केला जात आहे, नवरोज आणि मातृदिन एकाच दिवशी आल्याने ते साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पिकनिकसाठी निघाले होते. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक प्रवास करत असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच जोरात बचावकार्य सुरु झाले आहे. आतापर्यंत 55 लोकांना वाचविण्यात आले आहे, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा अधिक समावेश आहे. इराक मधील एका मोठ्या दुर्घटनेपैकी ही घटना असल्याने इराकचे पंतप्रधान आदिल अब्दुल महदी (Adil Abdul-Mahdi) यांना तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच या घटनेची चौकशीचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा: मुंबई सीएसएमटी रेल्वे स्टेशन जवळ पादचारी पूल कोसळला; 5 ठार, 30 जण जखमी)

इराकमध्ये नुकताच मोठा पाऊस झाला होता. मोसूल धरणातून हे पाणी सोडण्यात आले होते, त्यामुळे टिग्रीस नदीला पूर आला होता. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी सावधगिरीचा इशाराही दिला होता. मात्र अशा पाण्यात क्षमेतेपेक्षा अधिक लोक प्रवास करत असल्याने ही घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेत इराकमधील न्याय मंत्रालयाने, फेरी कंपनीच्या नऊ अधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत.