भारतीय महिलेचा दुबईत अनोखा विश्वविक्रम; 1000 दिवसांत गायली 1 हजार गाणी

यामुळे या महिलेचे नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Golden Book of World Records) नोंदवले गेले आहे. स्वप्ना अब्राहम असे या गायिकेचे नाव असून त्या 48 वर्षांच्या आहेत.

स्वप्ना अब्राहम (Photo Credit : Facebook)

जगात जवळजवळ प्रत्येक दिवशी अनेक लोक अनेक विश्वविक्रम बनवत असतात. यातील अनेक विश्वविक्रम हे काही गायकांच्या नावावरही नोंदवले गेले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय वंशाच्या महिलेने गाण्याच्या बाबतीत एक अनोखा विक्रम नोंदविला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, दुबईमध्ये राहणार्‍या भारतीय वंशाच्या महिलेने 1 हजार दिवसात चक्क 1 हजार गाणी गायली आहेत. यामुळे या महिलेचे नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Golden Book of World Records) नोंदवले गेले आहे. स्वप्ना अब्राहम (Swapna Abraham) असे या गायिकेचे नाव असून त्या 48 वर्षांच्या आहेत.

महत्वाच्या गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या गोष्टीची दखल घेण्यासोबत, स्वप्ना यांनी केलेल्या या विक्रमासाठी त्यांना चार पुरस्कार देण्यात आले आहेत. स्वप्ना यांनी 8 एप्रिल 2017 ते 2 जानेवारी 2020 म्हणजे 1000 दिवसांपर्यंत 1000 गाणी गायली आहेत. यात सर्व गीते, लाईव्ह मेकिंग, संगीत रचना, रेकॉर्डिंग इत्यादींचा समावेश आहे. आता स्वप्ना या डिजिटल अल्बममधील सर्वाधिक गाणी गाण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही अर्ज करणार आहेत. (हेही वाचा: Asha Bhosle Birthday Special: सुरांची सम्राज्ञी आशा भोसले; जाणून घ्या त्यांचे विश्वविक्रम, पुरस्कार व काही रंजक माहिती)

दरम्यान, स्वप्ना दुबईमध्ये मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्ममध्ये काम करतात. त्यांनी गायलेली आपली सर्व गाणी युट्यूबवर अपलोडही केली आहेत. 24 वर्ष संगीताशी व्यावसायिकरित्या जोडल्यानंतर आणि 22 अल्बममध्ये काम केल्यानंतरही स्वप्ना या एक कलाकार आणि संगीतकार म्हणून स्वत: ला अपूर्ण मानतात. याआधी त्यांनी संगीताच्या दुनियेपासून दूर जाण्याचा विचारही केला होता, मात्र या क्षेत्रात एक अवघड काम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता, त्यासाठीच घेतलेल्या मेहनतीचे फळ त्यांना या विक्रमाच्या रूपाने मिळाले आहे.