शत्रुत्व बाजूला सारून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली हुकुमशाह किम जोंग उन यांची भेट; उत्तर कोरियाला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष
उत्तर कोरियाला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले अध्यक्ष ठरले आहेत
अमेरिका (America) आणि उत्तर कोरियामध्ये (North Korea) छत्तीसचा आकडा आहे हे सर्वांनाच ठावूक आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही देश सोडत नाहीत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong-un) याची आज, म्हणजेच रविवारी भेट घेतली. उत्तर कोरियाला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले अध्यक्ष ठरले आहेत त्यामुळेही ही भेट ऐतिहसिक भेट मानली जात आहे. या भेटीनंतर ट्रम्प यांनी किम जोंग यांना व्हाईट हाउस भेटीचे आमंत्रण दिले आहे.
उत्तर कोरियातील सैन्यविरहीत भागात या दोन नेत्यांची भेट झाली. या भेटीसाठी ट्रम्प दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांच्या मध्यभागी पोहचले होते. किम यांनी टाळ्या वाजवून ट्रम्प यांचे स्वागत केले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करीत छायाचित्रही काढून घेतले. यावेळी उत्तर कोरियाने अण्वस्त्र निशस्त्रीकरणाबाबत ठोस पावले उचलल्याचे सांगत ट्रम्प यांनी किम यांचे कौतुक केले आहे. ट्रम्प आणि किम यांची तिसरी भेट आहे. या भेटीनंतर तरी दोन्ही देशातील तणाव कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा: खवळलेल्या 'किम जोंग'ने जनरलचे हात आणि धड तोडून खायला दिले नरभक्षक माशांना; जाणून घ्या कारण)
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांमध्ये गेली काही वर्षे शीतयुद्ध सुरु आहे. आता उत्तर कोरियाने अण्वस्त्र निशस्त्रीकरणाबाबत जे पाऊल उचलले आहे ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी स्वतःहून पुढे होऊन किम यांची भेट घेतली. त्यांची पहिली भेट सिंगापूरमध्ये झाली होती. दुसरी हनोईमध्ये व ही तिसरी भेट दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर झाली आहे.