Diwali in US: अमेरिकेचे अध्यक्ष Joe Biden यांनी थाटामाटात साजरी केली दिवाळी; पहिल्यांदाच दिवाळीच्या थीमवर सजले One World Trade Center (Watch Video)
यासोबतच हडसन नदीच्या काठावर फटाक्यांच्या आतिषबाजीचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले
सध्या देशभरात सर्वत्र दिव्याचा सण, रोषणाईचा उत्सव दिवाळी (Diwali 2021) साजरी होत आहे. हिंदू धर्मियांसाठी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. आजकाल हा उत्सव फक्त भारतात नाही तर जगभर साजरा होताना दिसत आहे. दिवाळीनिमित्त अनेक जागतिक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (US President Joe Biden) तसेच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस, सोबत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जो बिडेन यांनी पीपल्स हाऊसमध्ये दिवाळीचा सण साजरा केला. हातामध्ये मेणबत्ती घेऊन दिवे प्रज्वलित करतानाचा त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
यावेळी जो बिडेन म्हणाले की, ‘दिवाळीचा हा प्रकाश आपल्याला अंधारातूनच ज्ञान, शहाणपण आणि सत्य प्राप्त होईल, विभाजनातूनच एकता निर्माण होईल, निराशेतून आशेची पालवी फुटेल याची आठवण करून देवो. अमेरिका आणि जगभरात दिवाळीचा सण साजरा करणाऱ्या हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांना पीपल्स हाउसकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.’
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस म्हणाल्या की, ‘अमेरिका आणि जगभरात दिव्यांचा सण साजरा करणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. या वर्षीची दिवाळी विनाशकारी महामारीच्या काळात आणखी खोल अर्थ घेऊन येत आहे. हे पर्व आपल्याला आपल्या देशातील सर्वात पवित्र मूल्यांची आठवण करून देते, ते म्हणजे- आपले कुटुंब आणि मित्रांच्या प्रेमाप्रती असलेली कृतज्ञता. ज्यांना गरज आहे अशा लोकांची मदत करण्याची आपली जबाबदारी आणि अंधारामधून प्रकाश निर्माण करण्याची आपली ताकद.’ (हेही वाचा: Ayodhya Deepotsav 2021: अयोध्यामध्ये पार पडला दीपोत्सवाचा कार्यक्रम; तब्बल 12 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी, झाला विश्वविक्रम (Photo & Videos))
न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच वन वर्ल्ड ट्रेड सेंटरला (One World Trade Center) दिवाळीच्या थीमवर आधारित अॅनिमेशनने सजवण्यात आले आणि फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यासोबतच हडसन नदीच्या काठावर फटाक्यांच्या आतिषबाजीचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. ही फटाक्यांची आतषबाजी अतिशय मनमोहक होती. फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही काठावर हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. अशा प्रकारे अमेरिकेने जगाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.