Death Penalty for Using Social Media: सोशल मिडिया वापरल्याबद्दल धर्मोपदेशकाला सुनावली फाशीची शिक्षा; Saudi Arabia मधील धक्कादायक घटना
गेल्या ऑगस्टमध्ये, सलमा अल-शहाब नावाच्या महिलेला ट्विटर खाते वापरल्याबद्दल आणि मोहम्मद बिन सलमान राजवटीवर टीका करणारे ट्विट शेअर केल्याबद्दल 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) सोशल मिडियाच्या (Social Media) वापराबाबतचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार इथे, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केल्याबद्दल 65 वर्षीय प्राध्यापक/मौलवी अवद अल-कर्नी (Awad Al-Qarni) यांना सौदी अरेबियामध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर सोशल मीडियावर सरकारविरोधी बातम्या प्रसारित केल्याचा आरोप आहे.
क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सौदी अरेबियाची सत्ता हाती घेतल्यानंतर 9 सप्टेंबर 2017 रोजी या मौलवीला अटक करण्यात आली होती. अहवालानुसार, राज्य माध्यमांनी अवाद अल-कर्नी यांना जनतेसमोर 'धोकादायक उपदेशक' म्हणून खोटे चित्रित केले आहे. अटकेच्या एका मोहिमेचा भाग म्हणून अल-कर्नीला अटक करण्यात आली होती, ज्यात त्यांच्यासह किमान 20 लोकांचा समावेश होता.
सौदी अरेबियामध्ये मोहम्मद बिन सलमानच्या राजवटीत सोशल मीडियाचा वापर गुन्हा ठरला आहे, असे वृत्त द गार्डियनने दिले आहे. महत्वाचे म्हणजे किंग्ज पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक असताना सौदी अरेबियामध्ये ही परिस्थिती आहे. माहितीनुसार, अटक होण्यापूर्वी या धर्मगुरुंचे ट्विटरवर 2 दशलक्ष फॉलोअर्स होते.
गार्डियनने वृत्त दिले आहे की, अवाद अल-कर्नी यांनी अनेक गोष्टींवर आपले मत व्यक्त करण्यासाठी आपले ट्विटर खाते (@awadalqarni) वापरल्याचे कबूल केल्यानंतर, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांचा मुलगा नसीर याने वृत्तपत्राला त्यांच्यावरील आरोपांची माहिती दिली. नसीर गेल्या वर्षी सौदी अरेबियातून पळून गेला आणि तेव्हापासून तो यूकेमध्ये राहत आहे. व्हिडीओ आणि व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कट्टरपंथी इस्लामिक संघटना मुस्लिम ब्रदरहूडची कथित प्रशंसा केल्याचा आरोप अवाद अल-कर्नीवर आहे. त्यांनी टेलिग्रामचाही उघड वापर केल्याचे आरोपांमध्ये समाविष्ट आहे. (हेही वाचा: Afghanistan: तालिबानने पुन्हा जारी केला नवा फर्मान! महिलांना पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेता येणार नाहीत)
सोशल मीडियाचा वापर केल्याबद्दल सौदीच्या राजेशाहीने एखाद्याला शिक्षा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या ऑगस्टमध्ये, सलमा अल-शहाब नावाच्या महिलेला ट्विटर खाते वापरल्याबद्दल आणि मोहम्मद बिन सलमान राजवटीवर टीका करणारे ट्विट शेअर केल्याबद्दल 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच वेळी, नूरा बिंत सईद अल-काहत या आणखी एका महिलेला तिच्या सोशल मीडिया वापरासाठी 45 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.