Dawn, Pakistan News Channel Hacked: पाकिस्तानची लोकप्रिय वृत्तवाहिनी 'डॉन' झाली हॅक; स्क्रीनवर दिसू लागले भारतीय स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश व तिरंगा (Watch Video)
या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे हॅकिंग (Hacking). हॅकिंगमुळे अनेक कंपन्यांचे, लोकांचे, बँकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशात आता लोकांचे सोशल मिडिया खाती हॅक करण्याचे प्रमाणही वाढले आहे.
गेल्या अनेक वर्षांमध्ये जगाने तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगती केली आहे. या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे हॅकिंग (Hacking). हॅकिंगमुळे अनेक कंपन्यांचे, लोकांचे, बँकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशात आता लोकांचे सोशल मिडिया खाती हॅक करण्याचे प्रमाणही वाढले आहे. याचाच फटका आता पाकिस्तान (Pakistan) मधील एका मोठ्या वृत्त वाहिनीला डॉन (DAWN) ला बसला आहे. काही हॅकर्सनी DAWN वृत्तवाहिनी हॅक केल्याची माहिती मिळत आहे. ही वाहिनी हॅक झाल्यावर यावर भारतीय स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश आणि भारतीय ध्वज तिरंगा (Indian Tricolour) झळकले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानच्या डॉन न्यूज चॅनेलवर जाहिरात प्रसारित होत होती. त्याच वेळी टेलीव्हिजनच्या पडद्यावर अचानक तिरंगा झळकायला लागला, ज्यावर भारतीय स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा संदेश दिसत होते. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चॅनलवर हा व्हिडिओ किती काळ प्रसारित झाला हे अद्याप सांगण्यात आले नाही. ‘डॉन’ ही पाकिस्तानमधील एक प्रमुख वृत्तसंस्था आहे. इतकी मोठी वृत्त वाहिनी हॅक झाल्यानंतर सोशल मिडियावर याबाबत चर्चा सुरु आहे. (हेही वाचा: बराक ओबामा, बिल गेट्स अशा हाय प्रोफाईल लोकांच्या ट्विटर हॅक प्रकरणात तीन आरोपींना अटक; 17 वर्षांचा मुलगा सूत्रधार, एका दिवसात कमावले 1 लाख डॉलर)
पहा व्हिडिओ -
या प्रकारानंतर डॉन वाहिनीकडून अधिकृत स्टेटमेंट जारी केले गेले आहे, ज्यामध्ये ते म्हणतात, ‘डॉन न्यूज टीव्हीवर आज हॅकर्सनी हल्ला केला, त्यानंतर चॅनेलच्या स्क्रीनवर अचानक भारतीय तिरंगा दिसायला लागला. त्याच वेळी, स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा मजकूर प्रसारित होण्यास सुरुवात झाली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एजन्सी या प्रकरणाचा तपास करीत आहे आणि अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचताच प्रेक्षकांना त्याची माहिती देण्यात येईल.’
दरम्यान, याआधी एलओसी वरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, हॅकर्सनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या जनसंपर्क महासंचालनालयाचे संकेतस्थळ हॅक केले होते. वेबसाइटवर पोस्ट केलेल्या मेसेजेसमध्ये हॅकर्सनी इम्रान सरकारवर मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा कठोर आरोप केला होता. याशिवाय पीओकेला पाकिस्तानमधून मुक्त करण्यासाठी हॅकर्सनी घोषणाही लिहिल्या होत्या.