Cycling to Hospital in Labour: प्रसूती वेदनांमध्ये चक्क सायकलवरून हॉस्पीटलमध्ये पोहचल्या महिला खासदार; सोशल मिडियावर चर्चेला उधाण (See Photos)

2018 मध्ये अशाच प्रकारे सायकलवरून हॉस्पिटलमध्ये पोहचून ज्युली यांनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिल्याचे न्यूझीलंडच्या मीडियामध्ये सांगण्यात आले आहे.

Cycling to Hospital in Labour (संग्रहित संपादित प्रतिमा)

'वो स्त्री है कुछ भी कर सकती है’, हा बॉलीवूड चित्रपट ‘स्त्री’ मधील डायलॉग अनेकदा 100 टक्के योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक वेळा महिलांनी कठीण परिस्थितीत पुरुषांच्या कल्पनेपलीकडच्या गोष्टी करून दाखवल्या आहेत. असाच काहीसा प्रकार नुकताच न्यूझीलंडमध्ये (New Zealand) घडला. इथे एका अवघड परिस्थितीमध्ये महिला खासदाराने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. गर्भवती खासदार ज्युली अॅन जेंटर (MP Julie Anne Genter) यांच्या रात्री 2 वाजता पोटात दुखू लागले. त्यावेळी त्यांनी चक्क सायकलवर टांग मारली व तशा अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अगदी एका तासामध्ये म्हणजेच, साधारण 3.04 वाजता त्यांनी एका मुलाला जन्म दिला. ज्युली यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ही माहिती दिली. सायकल चालवण्यापासून बाळंतपणापर्यंतचे फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी लिहिले की, ‘मोठी बातमी! आज पहाटे 3.04 वाजता आमच्या कुटुंबात नवीन सदस्याचे स्वागत करण्यात आले. सायकलवर माझ्या प्रसूती वेदनांचा मी कधीच विचार केला नव्हता, पण ते घडले. आम्ही दवाखान्यासाठी निघालो तेव्हा फारसा त्रास होत नव्हता पण 2-3 मिनिटांचे अंतर पार करून दवाखान्यात जायला 10 मिनिटे लागली. आता आमचे गोंडस निरोगी बाळ त्याच्या वडिलांच्या मांडीवर झोपलेले आहे.’

ज्युली अॅन जेंटर यांना ग्रीन एमपी म्हणूनही ओळखले जाते. पर्यावरणासाठी केलेल्या प्रचारामुळे त्या चर्चेत असतात. ज्युली यांच्याकडे अमेरिका आणि न्यूझीलंडचे दुहेरी नागरिकत्व आहे. त्यांचा जन्म मिनेसोटा येथे झाला, परंतु 2006 मध्ये त्या न्यूझीलंडला गेल्या. 2018 मध्ये अशाच प्रकारे सायकलवरून हॉस्पिटलमध्ये पोहचून ज्युली यांनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिल्याचे न्यूझीलंडच्या मीडियामध्ये सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: Coronavirus: 'डेल्टा'पेक्षाही धोकादायक कोरोनाचा नवा स्ट्रेन Omicron; जगासमोर नवे आव्हान, घ्या जाणून)

नुकतेच न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत आपल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीसह सहभाग नोंदवला. त्यावेळी त्या स्तनपान करतानाही दिसल्या होत्या. या घटनेचीही सोशल मिडियावर बरीच चर्चा रंगली होती.