Credit Suisse Layoffs: क्रेडिट सुइसच्या 35,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची UBS ची योजना; तीन महिन्यांपूर्वी झाले होते अधिग्रहण

एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की कंपनी या वर्षात तीन वेळा नोकरकपात करू शकते.

Layoffs (PC- Pixabay)

अमेरिकेपासून सुरू झालेल्या अलीकडील बँकिंग संकट 2023 (Banking Crisis) चा सर्वात मोठा बळी युरोपमधील सर्वात जुन्या इन्व्हेस्टमेंट बँकांपैकी एक असलेला क्रेडिट सुइस (Credit Suisse) ठरला आहे. बँकेची ढासळत असलेली परिस्थिती लक्षात घेता, स्विस सरकारने हस्तक्षेप करून यूबीएसद्वारे (UBS) या बँकेचे अधिग्रहण केले. आता असे दिसते की क्रेडिट सुईसला नव्याने उभारताना यूबीएस स्वतः नवीन संकटात सापडले आहे.

यूबीएस ग्रुपने तीन महिन्यांपूर्वी क्रेडिट सुइसला रोखीच्या संकटातून वाचवले. आता कॉस्ट कटिंग लक्षात घेऊन क्रेडिट सुइसच्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. स्विस बँकेतील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास भाग पाडले जात आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यूबीएस क्रेडिट सुइसच्या 35,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे.

हे प्रमाण त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या 50 टक्क्यांहून अधिक आहे. बँकिंग संकटामुळे उद्ध्वस्त होण्यापूर्वी क्रेडिट सुइसमध्ये सुमारे 45,000 कर्मचारी होते. स्विस सरकारच्या हस्तक्षेपानंतर, तिथल्या आणखी एका मोठ्या बँकेने (UBS) संकटात सापडलेली क्रेडिट सुइस विकत घेण्याचे मान्य केले. या करारासाठी सरकारने 109 अब्ज स्विस फ्रँक्स म्हणजेच $120.82 अब्ज रुपयांचे बचाव पॅकेज तयार केले होते. (हेही वाचा: Nifty hits New Record: मुंबई शेअर बाजारात निफ्टीने पहिल्यांदा गाठला 19 हजारांचा टप्पा!)

डील अंतर्गत, यूबीएसने $3.25 बिलियन मध्ये बँक क्रेडिट सुईस विकत घेण्याचे मान्य केले. स्वित्झर्लंडसह अनेक देशांची सरकारे आणि बँकिंग नियामक क्रेडिट सुईसच्या संकटामुळे हैराण झाले होते. परंतु जेव्हा यूबीएस आणि क्रेडिट सुईस यांच्यात करार केला जात होता, तेव्हा अनेक विश्लेषकांनी मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची भीती व्यक्त केली होती. आता ही भीती खरी ठरताना दिसत आहे. मात्र यूबीएसने संभाव्य नोकर कपातीची अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

दरम्यान, अहवालानुसार, लंडन, न्यूयॉर्क आणि काही आशियाई देशांमधील क्रेडिट सुईस इन्व्हेस्टमेंट बँकेचे बँकर्स, व्यापारी आणि सपोर्ट स्टाफ यांना कंपनीतून बाहेर काढले जाईल. एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की कंपनी या वर्षात तीन वेळा नोकरकपात करू शकते. पहिली टाळेबंदीची प्रक्रिया जुलैच्या अखेरीस होऊ शकते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये नोकरकपात होईल.