Covid-19 Vaccine Update: युरोपीयन संघाच्या 'या' 7 देशांत Covishield लसीला मान्यता; प्रवासाचा मार्ग मोकळा
त्यामुळे या देशातील प्रवासाचा मार्ग भारतीयांसाठी खुला झाला आहे.
युरोपीय संघातील 8 देशांत सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या (Serum Institute of India) कोविशिल्ड (Covishield) लसीला मान्यता मिळाली आहे. एएनआयच्या (ANI) रिपोर्टनुसार, ऑस्ट्रिया (Austria), जर्मनी (Germany), स्लोवेनिया (Slovenia), ग्रीस (Greece), आइसलँड (Iceland), आयरलँड (Ireland), एस्टोनिया (Estonia) आणि स्पेन (Spain) या देशांमध्ये कोविशिल्ड लसीला मंजूरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्विर्झलँडमध्येही कोविशिल्ड लसीला मान्यता असून ही लस घेतलेल्या व्यक्तींना देशात प्रवेश करण्याची अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे या देशातील प्रवासाचा मार्ग भारतीयांसाठी खुला झाला आहे.
कोविडशील्ड आणि कोवॅक्सिन या लसी घेतलेल्या भारतीयांना युरोप प्रवास करण्यास परवानगी देण्याबाबत स्वतंत्रपणे विचार करण्याची विनंती भारताने युरोपियन संघाच्या 27 सदस्य देशांना करण्यात आली होती. तसंच कोविन पोर्टलमार्फत देण्यात आलेली लसीकरण प्रमाणपत्र स्वीकारण्याची विनंती देखील भारताने ईयूला केली होती.
ANI Tweet:
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी युरोपियन संघाचे उच्च प्रतिनिधी जोसेफ बोररेल फोंटेलीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ईयूच्या डिजिटल कोविड प्रमाणपत्र योजनेत कोविशिल्ड लसीचा समावेश करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. इटलीमध्ये जी -20 शिखर परिषदेच्या वेळी ही बैठक झाली होती.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस घेणाऱ्या व्यक्तींना 'ग्रीन पास' अंतर्गत युरोपीयन देशांमध्ये जाण्याची परवानगी मिळणार नाही, असा संभ्रम भारतात निर्माण झाला आहे. युरोपीय देशांची डिजिटल कोविड प्रमाणपत्र योजना (ग्रीन पास योजना) आजपासून अंमलात आणली असून या योजनेअंतर्गत लोकांना या देशांमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे.
युरोपीयन मेडिसिन एजन्सीने मान्यता दिलेल्या लसी जर प्रवाशांनी घेतल्या असतील तर त्यांना प्रवास करण्यास मुभा आहे. यात आता कोविशिल्ड लसीचा देखील समावेश झाला आहे. (Covishield लसीच्या दोन डोसेस मधील अंतर बदलणं कितपत योग्य? Niti Aayog ने दिले 'हे' स्पष्टीकरण)
कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपीयन देशात प्रवास करण्यास अडचण निर्माण होत आहे. परंतु, या समस्येवर लवकरच पाऊलं उचलली जातील, असे सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विटद्वारे सांगितले होते.
दरम्यान, आतापर्यंत देशात एकूण 33.57 कोटी लसी दिल्या गेल्या असून त्यापैकी 28 कोटींहून अधिक लोकांना कोविशिल्ड लस दिली गेली आहे.