Covid-19 Antiviral Pill: आता कोरोनावर उपचार करण्यासाठी होणार गोळीचा वापर; ब्रिटन ठरला Merck च्या Molnupiravir Pill ला मान्यता देणारा पहिला देश
यूकेचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले, 'आमच्या देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे कारण कोविडवर उपचार करण्यासाठी सोपी उपचारपद्धती अँटीव्हायरल गोळीला मान्यता देणारा यूके हा जगातील पहिला देश आहे.'
ब्रिटनने (UK) कोविड-19 (Coronavirus) च्या यशस्वी उपचारासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या अँटीव्हायरल गोळीच्या (Aantiviral Pill) सशर्त वापरास मान्यता दिली आहे. ब्रिटन हा असा पहिला देश आहे, ज्याने कोरोना विषाणूवर या गोळीद्वारे उपचार करणे योग्य मानले आहे. मात्र ही गोळी किती लवकर उपलब्ध होईल हे स्पष्ट झालेले नाही. 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या कोरोना संक्रमित लोकांना ही गोळी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे या औषधाचे नाव Molnupiravir Pill असे आहे. कोविडचा सौम्य संसर्ग असलेल्या लोकांना ही गोळी दिवसातून दोनदा घ्यावी लागेल.
ही कोविड-19 अँटीव्हायरल गोळी यूएस स्थित मर्क आणि रिजबॅक बायोथेरप्यूटिक्स (Ridgeback Biotherapeutics) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. ऑक्टोबरमध्ये, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी जाहीर केले की त्यांनी Molnupiravir चे 480,000 डोस मिळवले आहेत आणि या हिवाळ्यात या गोळीद्वारे आणखी हजारो लोकांवर उपचार करण्यात मदत होईल अशी अपेक्षा होती. ही अँटीव्हायरल गोळी कोरोनाची लक्षणे कमी करते आणि रोग्याला लवकर बरे करण्यास मदत करते. रुग्णालयांवरील कामाचा ताण आणि ओझे कमी करण्यासाठी तसेच गरीब देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही गोळी उपयुक्त ठरू शकते.
ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल, असा दावा केला जात आहे. ब्रिटननंतर आता यूएस, युरोप आणि इतर काही देशांतील संबंधित नियामक या औषधाचा आढावा घेत आहेत. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने गेल्या महिन्यात सांगितले की ते गोळीची सुरक्षा आणि परिणामकारकता शोधण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस पॅनेलची बैठक बोलावतील. (हेही वाचा: Covid-19 Transmission: पूर्णतः लसीकरण झालेल्या लोकांकडूनही घरात पसरू शकतो कोरोना विषाणूचा संसर्ग- Lancet Study)
यूकेचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले, 'आमच्या देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे कारण कोविडवर उपचार करण्यासाठी सोपी उपचारपद्धती अँटीव्हायरल गोळीला मान्यता देणारा यूके हा जगातील पहिला देश आहे.'