दिलासादायक: अमेरिकेत आजपासून सुरु होणार कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी; 45 युवकांवर होणार ट्रायल
अशात अमेरिकेत 45 निरोगी तरुणांना अनेक डोस देऊन या लसीची तपासणी केली जाईल. ज्यांचावर हा प्रयोग होत आहे, त्यांना कोरोना इन्फेक्शनचा धोका नाही.
कोरोना विषाणूचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. जगातील अनेक शहरांमध्ये कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन केले जात आहे. वाहतूक, मॉल्स, जिम्स अशा अनेक गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. बर्याच शहरांमध्ये विमानतळही बंद आहे. लोकांचे येणे जाणे जवळजवळ बंद आहे. संसर्ग होण्याच्या भीतीने बरेच लोक घर सोडत नाहीत. सेमिनार, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, सिट-अप या सर्व गोष्टी रद्द केल्या आहेत. अशात एक दिलासादायक बाब समोर येत आहे. आजपासून अमेरिकेमध्ये (America) कोरोना विषाणूच्या लसीची ट्रायल (Vaccine Trial) सुरु होत आहे.
कोरोना विषाणूवर मात देण्यासाठी जगाला त्याच्या लसीची आवश्यकता आहे. कोरोनाने सध्या जगातील 157 देशांत शिरकाव केला आहे. आतापर्यंत 6,515 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, तर एकूण 1,69,524 लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आजपासून कोरोना लसीची क्लिनिकल चाचणी सुरू करणार आहे. अमेरिकन सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी काही तरुणांवर या लसीची चाचणी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्था यास अर्थसहाय्य देत आहे, तर चाचणी सिएटलमधील वॉशिंग्टन आरोग्य संशोधन संस्थेत होईल. मात्र अधिकाऱ्यांच्या मते ही लस यशस्वी होण्यासाठी एक ते 18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
जगभरातील वैज्ञानिक कोरोना लस तयार करण्यात व्यस्त आहेत. अशात अमेरिकेत 45 निरोगी तरुणांना अनेक डोस देऊन या लसीची तपासणी केली जाईल. ज्यांचावर हा प्रयोग होत आहे, त्यांना कोरोना इन्फेक्शनचा धोका नाही. लसीचे दुष्परिणाम तपासण्याच्या उद्देशानेही चाचणी घेण्यात येत आहे. ही लस एनआयएच आणि मॉडर्ना इंक यांनी एकत्र बनविली आहे. या लसीची चाचणी परीक्षण म्हणून केली जात आहे. जर ते यशस्वी झाले तर ही लस संपूर्ण जगामध्ये वितरीत केली जाईल. जर चाचणी यशस्वी झाली तर ती संपूर्ण जगासाठी ही दिलासा देणारी गोष्ट ठरेल. (हेही वाचा: इस्त्रायलच्या शास्त्रज्ञांनी तयार केली कोरोना व्हायरसची लस; लवकरच होऊ शकते घोषणा, वृत्तपत्र Haaretz चा दावा)
त्याचबरोबर, कोविड-19 विषाणूला आयसोलेट करणारा भारत पाचवा देश बनला आहे. भारताच्या अगोदर चीन, जपान, थायलंड आणि अमेरिकेने विषाणूला आयसोलेट करण्यात यश संपादन केले आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 68 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 3.745 लोकांना याचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी कोरोनामुळे आणीबाणी लागू केली आहे. ट्रम्प यांनी स्वत: कोरोनाची चाचणी केली जी नकारात्मक असल्याचे दिसून आले.