Cat-Human Covid-19 Transmission: जगात पहिल्यांदाच मांजरीकडून मानवामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग; दुर्मिळ घटना असल्याचे तज्ञांचे म्हणणे

मात्र तिच्या नाकाची तपासणी केली असता मांजरीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. ही नाकाची तपासणी सुरु असताना मांजर शिंकली होती त्यानंतर तीन दिवसांनी डॉक्टरांनाही संसर्गाची लक्षणे दिसू लागली.

Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मांजरीपासून (Cat) माणसाला कोविड विषाणूचा (Coronavirus) संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण समोर आले आहे. एका निरोगी 32 वर्षीय पशुवैद्यकीय महिलेला संक्रमित मांजरीच्या संपर्कात आल्यानंतर कोविडची लागण झाली आहे. थायलंडमध्ये (Thailand) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एका संक्रमित रुग्णाच्या मांजरीवर उपचार करताना मांजर शिंकल्याने पशुवैद्यकाला संसर्ग झाल्याचे वृत्त होते. प्रिन्स ऑफ सॉन्गकला युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेला हा अभ्यास इमर्जिग इन्फेक्शियस डिजीज जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

पशुवैद्यकाने सांगितले की, तिने आणि दुसर्‍या पशुवैद्यकाने एका मांजरीची तपासणी केली होती, जिला कोविडची लागण झाली होती. मांजर त्याच पलंगावर झोपत असे जिथे तिचा संक्रमित मालक झोपत होता. प्राथमिक चाचणीत मांजर निरोगी असल्याचे दिसून आले होते. मात्र तिच्या नाकाची तपासणी केली असता मांजरीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. ही नाकाची तपासणी सुरु असताना मांजर शिंकली होती त्यानंतर तीन दिवसांनी डॉक्टरांनाही संसर्गाची लक्षणे दिसू लागली आणि तपासणी केली असता तिलाही संसर्ग झाल्याचे आढळून आले.

हा संसर्ग मांजरीपासून माणसात जाऊ शकतो याचा पुरावा अभ्यासात दिला आहे. मात्र तज्ञ म्हणतात की मांजरींपासून मानवांमध्ये विषाणू पसरण्याचा धोका कमी आहे. याउलट, न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, लोकांकडून मांजरींना संसर्ग पोहोचण्याची अधिक शक्यता असते. (हेही वाचा: कर्करोग बरा होतो, इतिहासात प्रथमच औषध चाचणीला यश? वैद्यकीय क्षेत्रात खळबळ)

मांजरीकडून मानवांमध्ये कोरोनाचे संक्रमण ही एक दुर्मिळ घटना असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. याआधीही काही प्राण्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली होती, परंतु काही दिवसांनी ते बरे झाले होते. हा विषाणू माणसांकडून प्राण्यांमध्ये पसरू शकतो आणि त्यानंतर तो पुन्हा मानवांमध्ये पसरू शकतो याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही. ज्या लोकांना व्हायरसची लागण झाली आहे त्यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांशी संपर्क टाळावा, असे आवाहन यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने केले आहे.