ब्राझीलमध्ये बंधारा फुटल्याने मोठा प्रलय; 11 जणांचा मृत्यू तर 300 जण वाहून गेल्याची भीती

आतापर्यंत यामध्ये 11 जणांचे मृतदेह सापडले असून, तब्बल 300 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे

ब्राझीलमध्ये फुटलेला बंधारा (Photo Credit- Twitter)

ब्राझील (Brazil) वर एक मोठी आपत्ती कोसळली आहे. दक्षिण पूर्व ब्राझील येथे एका खाणीलगतचा बंधारा फुटल्याने फार मोठा प्रलय आला आहे. आतापर्यंत यामध्ये 11 जणांचे मृतदेह सापडले असून, तब्बल 300 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये कुणी जिवंत असण्याची आशा फार कमी आहे. मिनास गेराईस (Minas Gerais) राज्यातील ब्रमादिन्हो आणि बेलो हॉरिझोन्टे शहराजवळ शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. हा बांध फुटल्याने परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून बचावकार्य जोरात सुरु आहे, यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात येत आहे.

लोह खनिज खाणीजवळ हा बंधारा होता, या बंधाऱ्याचा उपयोग सहसा केला जात नसे. स्थानिक अग्निशमन अधिकाऱ्यांनी यापूर्वी बेपत्ता असणाऱ्यांची संख्या 150 असल्याचे म्हटले होते. शनिवारी मात्र ही संख्या दुप्पट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामध्ये शेजारीच असलेल्या प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या पुरामुळे संपूर्ण परिसरात चिखल झाला असून, रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. तसेच खरे आणि पिके यांचे अतोनात नुकसान झाले आहे. (हेही वाचा : पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर धोक्यात; पुरातत्व खाते करणार पाहणी)

ब्राझीलमधील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक अशी ही घटना मानली जात आहे. ब्राझीलचे खाणसम्राट व्हाले यांच्या मालकीची ही खाण असून, यापूर्वी 2015 मध्ये खाणीचा काही भाग कोसळून 19 जण ठार झाले होते. आता जेव्हा हा बंध फुटला त्यावेळी खाणींत 427 लोक काम करीत होते, पैकी 279  जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. ब्राझीलमध्ये हा महिन्याच्या सुरुवातीलाच नवे सरकार आले आहे. अध्यक्ष जेअर बोलसोनारो यांच्या नव्या सरकारसमोर प्रथमच आणीबाणीची स्थिती उद्भवली आहे. मात्र सरकारने अगदी मोठ्या प्रमाणात बचावकार्य हाती घेतले आहे.