Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ Anmol Bishnoi ला अमेरिकेत अटक

अनमोलने कथितरित्या बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झीशान यांची छायाचित्रे स्नॅपचॅटद्वारे आरोपींना पाठवली होती.

Anmol Bishnoi and his brother Lawrence Bishnoi. (Photo credits: NIA and ANI)

Baba Siddique Murder Case: लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) याला सोमवारी (18 नोव्हेंबर 2024) अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे ताब्यात घेण्यात आले. अनमोलविरुद्ध गेल्या महिन्यात भारत सरकारने अजामीनपात्र कलमांतर्गत वॉरंट जारी केले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांनंतर ही कारवाई झाली आहे. अनमोल बिश्नोई हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी आहे.

अनमोलने अन्य आरोपी सुजित सुशील सिंगच्या माध्यमातून शस्त्रे आणि आर्थिक मदत केल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या तपासात करण्यात आला आहे. अनमोलने कथितरित्या बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झीशान यांची छायाचित्रे स्नॅपचॅटद्वारे आरोपींना पाठवली होती. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या 25 वर पोहोचली आहे.अनमोलचे नाव इतरही अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये आहे. पंजाबी गायक सिद्धू मूस वाला याच्या हत्येत मदत केल्याचा आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर हल्ल्याचा कट रचल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अनमोल बिश्नोईविरुद्ध नोंदवलेल्या दोन गुन्ह्यांव्यतिरिक्त त्याच्यावर 18 अन्य गुन्हेही नोंदवले आहेत. नुकतेच एनआयएने अनमोलला अटक करण्यात मदत करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएने लोकांना अनमोल बिश्नोईच्या ठावठिकाणाविषयी कोणतीही माहिती देण्याची विनंती केली होती. (हेही वाचा: Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबारानंतर 30 मिनिटं हॉस्पिटलबाहेर उभा होता शूटर; काय होतं यामागचं कारण? वाचा सविस्तर)

अनमोल बिश्नोईने आपला भाऊ लॉरेन्सच्या पावलावर पाऊल ठेवत गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला आहे. 7 ऑक्टोबर 2021 रोजी अनमोलची जामिनावर सुटका झाली. 2023 मध्ये तपास यंत्रणेने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. बनावट पासपोर्टवर तो भारतातून पळून गेला होता. त्यानंतर अनमोल बिश्नोई आपली ठिकाणे बदलत राहिला आणि गेल्या वर्षी केनिया आणि यावर्षी कॅनडामध्ये दिसला.