ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीत 48 कोटी प्राणी आणि पक्षांचा होरपळून मृत्यू
ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीत सुमारे 48 कोटी प्राणी आणि पक्षांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये सतत जंगलाला आग (Australia Forest Fires) लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीत अनेक पक्षी तसेच प्राण्याचा बळी गेला आहे. आतापर्यंत या आगीत अनेकांचे संसार जळून खाक झाले आहेत. मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियामधील जंगलात लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे 48 कोटी प्राण्यांचा आणि पक्षांचा यात होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये हजारो कोआला पक्षाचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही या वृत्ताला पुष्टी दिली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार, या आगीत तब्बल 48 कोटी प्राणी आणि पक्षांचा जीव गेला आहे. याबाबत हफिंग्टन पोस्टने वृत्त दिलं आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्याला या वणव्यांचा सर्वात जास्त फटका बसला आहे. येथील मोठा भूभाग या आगीच्या विळख्यात सापडला होता. कोरडी हवा, दीर्घकाळापासून असलेला दुष्काळ, वाढलेलं तापमान आणि जोरदार वारे या सर्व गोष्टींचा एकत्र परिणाम म्हणून हे वणवे लागत आहेत आणि इतरत्र पसरत आहेत. (हेही वाचा - अॅमेझॉनच्या जंगलाला भीषण आग, बॉलिवूड कलाकारांनी #PrayForAmazons वापरत सोशल मीडियात व्यक्त केल्या भावना )
या आगीमुळे दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील 'फ्लिंडर्स चेस नॅशनल पार्क' कांगारू बेट भागात 14 हजार हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आहे. आगीमुळे कांगारू बेट भागातील 70 टक्के लोक स्थलांतरीत झाले आहेत. फेब्रुवारी 2009 मध्ये ऑस्ट्रेलियात सर्वात भयानक वणवा पेटला होता. या दुर्घटनेत व्हिक्टोरियामध्ये 180 जणांचा बळी गेला होता.