AstraZeneca आणि Oxford University सप्टेंबरपर्यंत दोन अब्ज कोरोना लस तयार करणार; पुण्याची 'ही' मोठी कंपनी करत आहे मदत
असे म्हटले जात आहे की, कोरोना विषाणूची लस सापडली नाही तर हा रोग नियंत्रित करणे अवघड ठरू शकते.
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूची लस (Coronavirus Vaccine) बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. असे म्हटले जात आहे की, कोरोना विषाणूची लस सापडली नाही तर हा रोग नियंत्रित करणे अवघड ठरू शकते. अशात एक दिलासादायक बाब समोर येत आहे, ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या (Oxford University) भागीदारीत लस विकसित करणार्या ब्रिटीश दिग्गज फार्मा कंपनी अॅस्ट्रॅजेनेकाने (AstraZeneca) सांगितले आहे की, ते सप्टेंबरपर्यंत दोन अब्ज (200 दशलक्ष) कोरोना लस (AZD1222 Vaccine) तयार करतील. दरम्यान अमेरिकेनेही सांगितले आहे की, त्यांनी आधीच दोन दशलक्ष (20 दशलक्ष) कोरोना लस तयार केल्या आहेत ज्या 'सुरक्षिततेच्या चाचणीसाठी' तयार आहेत.
याबाबत अॅस्ट्रॅजेनेकाचे मुख्य कार्यकारी पास्कल सॉरियट यांनी बीबीसी रेडिओला सांगितले, 'आतापर्यंत तरी आम्ही योग्य मार्गावर आहोत. आम्ही आता ही लस तयार करण्यास सुरवात करत आहोत. आमचा विश्वास आहे की उन्हाळ्याच्या शेवटी, म्हणजे ऑगस्टपर्यंत आमच्याकडे त्याचा संपूर्ण डेटा असेल.' ब्रिटनची ही फार्मा कंपनी अॅस्ट्रॅजेनेका यांनी काही दिवसांपूर्वी पुण्याची (Pune) भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि बिलगेट्स समर्थित असलेल्या दोन जागतिक आरोग्य संघटनांशी करार केला आहे. त्याअंतर्गत, अॅस्ट्रॅजेनेकाच्या संभाव्य कोरोना विषाणूच्या लसीचे 2 अब्ज डोस या वर्षात आणि पुढच्या वर्षी पुरविले जातील. (हेही वाचा: जगभरातील COVID19 च्या संक्रमितांचा आकडा 68 लाखांच्या पार तर 4 लाखांहून अधिक जणांचा बळी)
ही लस सध्या मानवी चाचण्यांच्या टप्प्यात आहे, परंतु त्यामध्ये ही यशस्वी झाल्यास पुढील काही महिन्यांत कंपनीला कोट्यवधी डोस तयार होण्याची आशा आहे. चाचणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, 18 ते 55 वयोगटातील निरोगी व्यक्तींवर या लसची चाचणी घेण्यात आली. पुढच्या टप्प्यात, संशोधक 10,260 अधिक लोकांवर लसीची चाचणी घेणार आहेत, तसेच यामध्ये मुले व वृद्ध व्यक्तींचाही समावेश करण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठी लस तयार करणारी भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोबत, अॅस्ट्रॅजेनेका गरीब देशांना 100 दशलक्ष कोरोना विषाणूची लस पुरवणार आहे.