Amir Liaquat Hussain Passes Away: पाकिस्तानचे खासदार आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट आमिर लियाकत हुसैन यांचे निधन; राहत्या घरात बेशुद्धावस्थेत आढळले
जिओ न्यूजनुसार, आमिर त्यांच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळले होते. यानंतर त्यांना अत्यवस्थ अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट आमिर लियाकत हुसैन (Amir Liaquat Hussain) यांचे गुरुवारी निधन झाले. आमिर लियाकत हुसैन हे त्यांचे तिसरे लग्न आणि घटस्फोट यावरून अनेक चर्चेत आले होते. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर लियाकत हुसैन हे त्यांच्या कराचीतील घरात मृतावस्थेत आढळून आले. इम्रान खान यांच्या पक्षातून खासदार झालेले आमिर लियाकत हुसैन हे शाहबाज शरीफ यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पीटीआय नेत्याशी फारकत घेऊन वेगळे झाले होते.
आमिर लियाकत हुसेन 49 वर्षांचा होते. जिओ न्यूजनुसार, आमिर त्यांच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळले होते. यानंतर त्यांना अत्यवस्थ अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार, लियाकत यांना काल रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते पण त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. जेव्हा ते वेदनेने ओरडले तेव्हा त्यांचा नोकर तिथे पोहोचला. दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडला असता ते खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदनासाठी त्यांच्या कुटुंबाची परवानगी घेण्यात आली असून त्यानंतर मृत्यूच्या कारणाचा अहवाल तयार केला जाईल. शिवाय, अमीर यांचा ड्रायव्हर जावेद यानेच पोलिसांना घटनेची माहिती दिल्याने त्याचा जबाबही पोलीस घेणार आहेत. लियाकत यांच्या अंत्यसंस्काराची वेळ लवकरच जाहीर केली जाईल,
लियाकत मार्च 2018 मध्ये पीटीआयमध्ये सामील झाले होते. पाकिस्तानची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या कराचीमधून त्यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांचे टीव्हीवरील कार्यक्रम खूप गाजले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात अमीर लियाकत यांच्या मृत्यूमागे कोणताही कट नसल्याचे दिसून येत आहे. अमीर लियाकत यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनानंतर पाकिस्तानच्या संसदेचे अधिवेशन स्थगित करण्यात आले. (हेही वाचा: कर्करोग बरा होतो, इतिहासात प्रथमच औषध चाचणीला यश? वैद्यकीय क्षेत्रात खळबळ)
दरम्यान, आमिर लियाकत हुसैन यांचा जन्म 5 जुलै 1972 रोजी झाला. त्यांना दोन मुलेही आहेत. आमिर लियाकत यांनी तीन विवाह केले होते. त्यांनी 2018 मध्ये तौबा अन्वरसोबत दुसरे लग्न केले. तिच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी 2022 मध्येच दानिया शाहसोबत लग्न केले. दानिया शाह त्यांच्यापेक्षा 31 वर्षांनी लहान होती. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी दानियाने त्यांच्याकडे घटस्फोट मागितला होता.