Allegation on Infosys: भारतीय वंशाच्या उमेदवारांना कामावर घेण्यास इन्फोसिसचा नकार; कंपनीवर होत आहेत लिंगभेदाचे आरोप
तिचे काम ‘हार्ड-टू-फाइंड एक्झिक्युटिव्ह्ज’ भरती करणे हे होते. प्रेझियन 2018 मध्ये 59 वर्षांची असताना इन्फोसिसशी संबंधित होती.
भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसवर (Infosys) पुन्हा एकदा वय आणि लिंगभेदाचा (Age and Gender Bias) आरोप होत आहे. इन्फोसिसच्या टॅलेंट अॅक्विझिशनच्या माजी उपाध्यक्ष जिल प्रेझियन (Jill Prejean) यांनी अमेरिकेच्या न्यायालयात गंभीर आरोपांसह तक्रार दाखल केली आहे. इन्फोसिसने भारतीय वंशाच्या लोकांना, मुले असलेल्या महिला आणि 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या उमेदवारांना नियुक्ती टाळण्यास सांगितले होते, असे प्रेझियनने नोंदवले. अशा बेकायदेशीर, भेदभावपूर्ण मापदंडांच्या आधारावर उमेदवारांची स्क्रीनिंग करण्यास नकार दिल्याबद्दल माझ्याशी देखील भेदभाव करण्यात आला. अनेक अधिकाऱ्यांनी माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, असे प्रेझियन सांगितले.
प्रेझियनने आरोप केला आहे की, तिला या नियमांचे पालन न केल्याबद्दल काढून टाकण्याची धमकी दिली गेली आणि प्रतिकूल कामाच्या वातावरणासह तिला स्वतःला भेदभावाचा सामना करावा लागला. कथित दबाव मोहिमेनंतर तिला नंतर काढून टाकण्यात आले. न्यूयॉर्कमधील युनायटेड स्टेट्स जिल्हा न्यायालयाने इन्फोसिसला याबाबत झटका देत, शुक्रवारी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. इन्फोसिसने जिल प्रेझियन यांनी दाखल केलेला खटला रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली होती.
प्रेझियनने इन्फोसिसचे माजी वरिष्ठ व्हीपी आणि सल्लागार प्रमुख मार्क लिव्हिंगस्टन आणि माजी भागीदार डॅन अल्ब्राइट आणि जेरी कुर्ट्झ यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. जिल प्रेझियनने इन्फोसिसवर तिला अन्यायकारकरित्या बडतर्फ केल्याचा आरोप केला आहे. बेकायदेशीर नियुक्ती मागण्यांचे पालन करण्यास आक्षेप घेतल्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे प्रेझियन यांनी सांगितले. (हेही वाचा: जागतिक मंदीची चिन्हे? Facebook च्या 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कधीही जाण्याची शक्यता- Report)
इन्फोसिसने त्यांच्या कंपनीत सल्लागार विभागाचे उपाध्यक्ष म्हणून जिल प्रेझियन यांची नियुक्ती केली होती. तिचे काम ‘हार्ड-टू-फाइंड एक्झिक्युटिव्ह्ज’ भरती करणे हे होते. प्रेझियन 2018 मध्ये 59 वर्षांची असताना इन्फोसिसशी संबंधित होती. आता अशाप्रकारे प्रेझियनने कंपनीवर वय आणि लिंगावर आधारित भेदभावाचा आरोप केला आहे.