राजघराणे सोडल्यानंतर Prince Harry ने जॉईन केली BetterUp स्टार्टअप कंपनी; मिळाले Chief Impact Officer चे पद
2013 मध्ये स्थापन झालेल्या या स्टार्टअप कंपनीत एकूण 270 हून अधिक कर्मचारी आणि जवळजवळ 2 हजार प्रशिक्षक आहेत.
ब्रिटनचे प्रिन्स हॅरी (Prince Harry) राजघराणे सोडल्यानंतर आता अमेरिकेतील एका कंपनीत नोकरी करणार आहेत. इंग्लंडची राणी आणि आपल्या आजीशी फारकत घेतल्यानंतर प्रिन्स हॅरी आपली पत्नी मेघन मार्केलसमवेत अमेरिकेत वास्तव्यास आहेत. आता प्रिन्स हॅरी यांनी सामान्य व्यक्ती म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील कंपनी BetterUp साठी ते 'चीफ इम्पेक्ट ऑफिसर' म्हणून काम करतील. ही कंपनी कर्मचार्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी कोचिंग देण्याचे काम करते. स्टार्टअप टीमचे अधिकारी अलेक्सी रॉबीचॉक्स म्हणाले की, कंपनीला प्रिन्स हॅरी यांची खूप मदत होणार आहे.
BetterUp मोबाईल-बेस्ड कोचिंग, मार्गदर्शन आणि सल्ला देणारी कंपनी म्हणून जगभरात लोकप्रिय आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यात वैयक्तिक विकास आणि व्यावसायिक विकासासाठी वर्तणूक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी प्रशिक्षण यांचा समावेश आहे. बेटरअपने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की त्यांनी, 125 दशलक्ष (सुमारे 900 कोटी रुपये) जमा केले आहेत. 2013 मध्ये स्थापन झालेल्या या स्टार्टअप कंपनीत एकूण 270 हून अधिक कर्मचारी आणि जवळजवळ 2 हजार प्रशिक्षक आहेत.
या स्टार्टअपच्या ग्राहकांच्या यादीमध्ये नासा, शेवरॉन, मार्स, स्नॅप आणि वॉर्नरची नावे आहेत. या कंपनीचे एकूण मूल्य 1.73 अब्ज डॉलर्स (12.5 हजार कोटी रुपये) असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी कल्याण आणि त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी याबाबतच्या कोचिंगची मागणी गेल्या एका वर्षात खूप वाढली आहे.
कंपनी जॉईन केल्यानंतर प्रिन्स हॅरीने BetterUp टीमच्या ब्लॉग पोस्टवर लिहिले की, 'माझा विश्वास आहे की आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केल्याने आणि त्यास प्राधान्य दिल्याने अनेक संधींचे दरवाजे उघडतात. या संधींबाबत आपल्यामध्ये माहीतही नसते की त्या आधीपासून आपल्यामध्ये अस्तित्त्वात आहेत. रॉयल मरीन कमांडो म्हणतात, ही मनाची अवस्था आहे आणि ती आपल्या सर्वांमध्ये घडते.' (हेही वाचा: Meghan Markle चा ब्रिटनच्या राजघराण्यावर वर्णभेदाचा आरोप; Oprah Winfrey ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले अनेक धक्कादायक खुलासे)
दरम्यान, प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी गेल्या वर्षी राजघराणे सोडण्याची घोषणा केली होते. यानंतर यावर्षी राजघराण्याशी त्यांचे संबंध संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. या गोष्टीची चर्चा जगभर झाली. आता नुकत्याच झालेल्या मुलाखतीत, प्रिन्स हॅरी म्हणाले होते की राजपरिवार सोडणे हा एक कठीण निर्णय होता.