Afghanistan: विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी फक्त पुरुष विद्यार्थीच बसू शकतात, मुलींना परवानगी नाही; Taliban ने काढले नवे फर्मान
अलीकडेच, तालिबानने काबूल आणि देशभरातील इतर प्रांतांमध्ये महिलांच्या ब्युटी सलूनवर बंदी घालणारा एक नवीन फर्मान जारी केला.
अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) जेव्हापासून तालिबानने सत्ता हाती घेतली आहे, तेव्हापासून तालिबानी अधिकारी महिलांवर कडक निर्बंध लादत आहेत. तालिबान अधिकार्यांनी अलीकडेच अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींवर शिक्षण आणि रोजगारासह निर्बंध वाढवले आहेत. आता अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (NEXA) सांगितले आहे की, उच्च शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, यावर्षी केवळ पुरुष विद्यार्थीच विद्यापीठ प्रवेश परीक्षेला उपस्थित राहू शकतात. टोलो न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.
अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने ट्विटरवर सांगितले की, हा निर्णय उच्च शिक्षण मंत्रालयाने (MoHE) घेतला आहे आणि प्राधिकरणाला पत्र पाठवले आहे. कोणी परीक्षा द्यायची आणि कोणी देऊ नये हे ठरवण्याची जबाबदारी उच्च शिक्षण मंत्रालयाची आहे, नेक्सा यासाठी जबाबदार नसल्याचे प्राधिकरणाने सांगितले. नेक्सानुसार या परीक्षा पाच फेऱ्यांमध्ये घेतल्या जातील. पहिली फेरी 11 प्रांतात, दुसरी फेरी 12 प्रांतात, तिसरी फेरी 10 प्रांतात आणि चौथी फेरी काबूलमध्ये होणार आहे. शिवाय, पाचव्या फेरीत मागील परीक्षा चुकलेल्या किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल.
तालिबानने मार्च 2022 मध्ये माध्यमिक शाळेतील मुलींवर बंदी घातली, महिलांना मानवतावादी मदत एजन्सीसाठी काम करण्यास मनाई केली आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महिलांना उच्च शिक्षण घेण्यास मनाई केली. याआधी मे आणि जूनमधील घडामोडींचा समावेश असलेल्या अहवालात, अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र मिशनने म्हटले आहे की, तालिबानच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने घोषित केले की, विशेष वैद्यकीय अभ्यासासाठी देखील फक्त पुरुषांनाच परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल. (हेही वाचा: 'धूम्रपान करणाऱ्यांकडे टक लावून तिरस्काराने पाहा'; तंबाखूला आळा Hong Kong प्रशासनाचे जनतेला आवाहन)
दरम्यान, तालिबान सरकारने महिलांवर लादलेल्या निर्बंधांची यादी बरीच मोठी आहे. अलीकडेच, तालिबानने काबूल आणि देशभरातील इतर प्रांतांमध्ये महिलांच्या ब्युटी सलूनवर बंदी घालणारा एक नवीन फर्मान जारी केला. या बंदीला महिलांनी कडाडून विरोध केला आहे. या बंदीच्या विरोधात अफगाणी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत.