Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप; तब्बल 950 जणांचा मृत्यू, 610 जखमी

पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या भीषण भूकंपात आपल्या देशातील शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Afghanistan Earthquake (संग्रहित संपादित प्रतिमा)

अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमध्ये बुधवारी पहाटे भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. USGS ने दिलेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 नोंदवण्यात आली. आग्नेय अफगाणिस्तानमधील खोस्त शहरापासून सुमारे 44 किमी (27 मैल) अंतरावर 51 किमी खोल हा भूकंप झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील भूकंपामुळे 950 लोकांचा मृत्यू झाला असून 610 लोक जखमी झाले आहेत. खोस्त आणि नांगरहार या पूर्वेकडील प्रांतांमध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. भूकंपग्रस्त पाकटिकामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले आहे, तसेच येथे भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत.

या भुकंपामधील मृतांचा आकडा वाढू शकतो, असे आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानचे आपत्कालीन सेवा अधिकारी शराफुद्दीन मुस्लिम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मृतांच्या संख्येची माहिती दिली. यापूर्वी 'बख्तर' या वृत्तसंस्थेचे महासंचालक अब्दुल वाहिद रायन यांनी ट्विट केले होते की, पक्तिकामध्ये 90 घरे उद्ध्वस्त झाली असून अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

तालिबान सरकारचे उप प्रवक्ते बिलाल करीमी यांनी मृतांच्या संख्येबाबत कोणतीही अचूक माहिती दिली नाही. पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या भीषण भूकंपात आपल्या देशातील शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही सर्व मदत एजन्सींना विनंती करतो की त्यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी ताबडतोब त्यांच्या पथकांना घटनास्थळी पाठवावे.’

या परिस्थितीमुळे 38 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशात मदत आणि बचाव कार्य करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एका निवेदनात भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबद्दल शोक व्यक्त करत, त्यांचा देश अफगाणिस्तानातील लोकांना मदत करेल असे म्हटले आहे. शेजारील पाकिस्तानच्या हवामान खात्यानेदेखील भूकंपाची तीव्रता 6.1 नोंदवली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि पूर्व पंजाब प्रांतातील इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. (हेही वाचा: तालिबानच्या राजवटीमध्ये लोकप्रिय टीव्ही अँकरवर आली स्ट्रीट फूड विकण्याची वेळ)

दरम्यान, 2015 मध्ये, अफगाणिस्तानच्या ईशान्य भागात भूकंप झाला होता, ज्यात अफगाणिस्तान आणि लगतच्या उत्तर पाकिस्तानमध्ये शेकडो लोक मारले गेले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा असा जोरदार भूकंप झाला आहे.



संबंधित बातम्या