Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे महिलांसाठी आणखी एक फर्मान; घातली घरातील खिडक्यांवर बंदी, जाणून घ्या कारण
आता तालिबान नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने आदेश दिला आहे की, इमारतींमध्ये महिला बसू शकतील किंवा उभ्या राहू शकतील अशा खिडक्या नसाव्यात.
तालिबानच्या (Taliban) राजवटीत अफगाणिस्तानातील (Afghanistan) महिलांचे जीवन सतत वाईट होत चालले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तालिबानने महिलांवर इतके निर्बंध लादले आहेत, की त्यांचे जीवन जगणे अवघड झाले आहेत. आता तालिबान नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने आदेश दिला आहे की, इमारतींमध्ये महिला बसू शकतील किंवा उभ्या राहू शकतील अशा खिडक्या नसाव्यात. सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या चार कलमांच्या आदेशानुसार, हा आदेश नवीन इमारतींबरोबरच सध्याच्या इमारतींनाही लागू आहे. ज्या खिडक्यांमधून महिला दिसतील अशा खिडक्यांसाठी हा आदेश जारी करण्यात आला असून, सध्याच्या खिडक्याही बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
अश्लीलता थांबवण्यासाठी हा निर्बंध लागू केल्याचे सांगण्यात आले आहे. तालिबानच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, महिलांना स्वयंपाकघरात, अंगणात किंवा विहिरीतून पाणी आणताना पाहण्याने अश्लीलता वाढू शकते. अफगाणिस्तानमधील महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नव्याने बांधल्या जाणाऱ्या इमारतींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह, या इमारतींमध्ये अशा खिडक्या बनवता येणार नाहीत, ज्याद्वारे शेजारच्या घरात डोकावता येईल, हे निश्चित केले जाईल. आदेशात म्हटले आहे की, जर अशा खिडक्या आधीच अस्तित्वात असतील तर घरमालकांना त्यांच्यासमोर विटांची भिंत बांधण्यास सांगितले जाईल.
यासह दुसऱ्या आदेशात, तालिबान सरकारने अफगाणिस्तानातील सर्व राष्ट्रीय आणि परदेशी स्वयंसेवी संस्थांना महिलांना नोकरी देणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित एनजीओचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा अर्थ मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या पत्रात दिला आहे. तालिबाननेही दोन वर्षांपूर्वी असाच आदेश दिला होता, ज्यात महिला इस्लामिक हिजाब नीट पाळत नसल्याचा दावा केला होता. आता महिलांना अशासकीय संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे काम करण्यापासून रोखण्यात आले आहे. (हेही वाचा: Afghan-Pakistani Border Clash: तालिबानचा बदला, अफगाण सीमेवर भीषण चकमक, 19 पाकिस्तानी सैनिक ठार)
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग प्रशिक्षणावर बंदी घातली होती. त्यामागील कारणही स्पष्ट झाले नाही. या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाण महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास आणि चेहरा दाखवण्यास बंदी घालण्यात आली होती. यासोबतच महिलांनी अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे, असेही सांगण्यात आले. याशिवाय तालिबानने महिलांना खेळात सहभागी होण्यासही बंदी घातली आहे.