चीन सरकारचा मोठा निर्णय; वुहानमध्ये वन्य प्राण्यांची विक्री व मांस खाण्यावर पूर्णपणे बंदी, कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढल्याने नवा निर्बंध लागू

गेले काही दिवस वूहानमधील जंगली प्राण्यांच्या बाजाराबद्दल अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.

China Market (Photo Credits: Pixabay)

जागतिक साथीचा रोग, कोरोना व्हायरस (Coronavirus) हा चीनच्या वूहान (Wuhan) शहरातून सुरु झाला होता. गेले काही दिवस वूहानमधील जंगली प्राण्यांच्या बाजाराबद्दल अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. तिथले लोक विविधांगी प्राणी खातात याबाबत टीकाही झाली होती. आता चीनने एक महत्वाचा निर्णय घेत वुहानमध्ये वन्य प्राण्यांच्या (Wild Animals) मांसावर बंदी घातली आहे. ‘ब्रिटीश न्यूज एजन्सी’च्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरसबाबत चालू असलेले संशोधन, या रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि एकूणच इतर परिस्थिती लक्षात घेता वुहानमध्ये वन्य प्राण्यांची शिकार आणि ते खाण्यावर अधिकृतपणे बंदी घातली आहे. बुधवारी वुहान शहरातील स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे की, इथला मांस बाजार पूर्णपणे बंद केला जात आहे.

वूहान शहरातील प्रत्येक प्रकारच्या वन्य प्राण्यांना खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वुहान सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार, नवीन धोरण पुढील पाच वर्षांसाठी कायम राहील. वुहानची लोकसंख्या 11 दशलक्ष आहे आणि येथेच कोरोना विषाणूची पहिली घटना डिसेंबर 2019 मध्ये नोंदवली गेली होती. मात्र अद्याप हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही की, हा विषाणू याच बाजारातून बाहेर पडला आहे. असे म्हणतात की, वुहानमधील हुनान सी फूड मार्केटमध्ये 30 वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे मांस विकले जाते. जानेवारीत हा बाजार बंद होता पण मार्चमध्ये तो पुन्हा उघडण्यात आला.

(हेही वाचा: जगभरात 50 लाख नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित; 3 लाख 28 हजारांहून अधिक मृत्यू; अमेरिका, रशिया, ब्राझील, इंग्लंड सर्वात आघाडीवर)

काही दिवसांपूर्वी वुहानमध्ये पुन्हा कोरोनो विषाणूची प्रकरणे आढळली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे कोरोना विषाणूची सुरूवात चीनच्या वुहानच्या वन्य प्राण्यांच्या मांस बाजारात झाली होती आणि याच ठिकाणी वटवाघुळासह अनेक प्राण्यांचे मांस विकले जाते, असे सांगितले जात आहे. यामुळे हा विषाणू वटवाघुळ किंवा उंदीर यांच्याद्वारे मनुष्यात आला असण्याची शंका आणखीनच वाढली. आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर, चीनच्या सर्वोच्च विधिमंडळ समितीने चीनमधील सर्व वन्यजीवांच्या व्यापारावर बंदी घालणे आणि त्यांचा आहार म्हणून वापर करण्यावर बंदी घालण्याचा विचार केला, ज्यामुळे या प्राण्यांच्या विक्री व खरेदीवर पूर्ण बंदी आली आहे.