Earthquake in Japan: जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के; 4 ठार, 100 जखमी, 20 लाख घरांचा वीजपुरवठा ठप्प
गुरुवारी सकाळी झालेल्या भूकंपानंतर बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने तोहोकू शिंकनसेन बुलेट ट्रेन सेवेचा काही भाग बंद करण्यात आला आहे.
Earthquake in Japan: ईशान्य जपानमध्ये बुधवारी रात्री झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने 4 जण ठार तर 100 जण जखमी झाले. पोलिस आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, मियागी आणि फुकुशिमासह सात प्रांतांमध्ये 7.4-रिश्टर स्केलचा भूकंप झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 06.30 वाजेपर्यंत या प्रांतांमध्ये झालेल्या भूकंपात 100 लोक जखमी झाले आहेत.
देशाच्या ईशान्येकडील आणि पूर्वेकडील भागात, विशेषत: मियागी आणि फुकुशिमा प्रदेशात सहापेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. स्थानिक वेळेनुसार रात्री 1136 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू 37.7 अंश उत्तर अक्षांश आणि 141.7 पूर्व रेखांशावर 60 किमी खोलीवर होता. (हेही वाचा - Russia-Ukraine War: भारतीय न्यायाधीश Dalveer Bhandari यांनी रशियाच्या विरोधात केलं मतदान; ICJ ने दिले युक्रेनमधील युद्ध त्वरित थांबवण्यास आदेश)
बुलेट ट्रेन रुळावरून घसरली -
गुरुवारी सकाळी झालेल्या भूकंपानंतर बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने तोहोकू शिंकनसेन बुलेट ट्रेन सेवेचा काही भाग बंद करण्यात आला आहे. ईस्ट निप्पॉन एक्सप्रेसवे कंपनीने एक्स्प्रेसवेचे अनेक विभाग तात्पुरते बंद केले आहेत, ज्यामध्ये ओसाकी, मियागी प्रांतातील थोकू एक्सप्रेसवे आणि सोमा, फुकुशिमा येथील जोबान एक्सप्रेसवे यांचा समावेश आहे.
भूकंपाच्या धक्क्यांनंतर सुमारे 20 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. मियागी आणि फुकुशिमा प्रांतातील किनारी भागांसाठी एक मीटरच्या त्सुनामी लाटेचा इशारा जारी करण्यात आला आणि लोकांना किनारपट्टीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. गेल्या वर्षी मार्चमध्येही जपानची राजधानी टोकियोमध्ये असेच काही भूकंपाचे धक्के जाणवले होते. यूएसजीएसनुसार भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी होती.