Bangladesh Container Depot Fire: बांगलादेशातील कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत 35 ठार; 450 हून अधिक जण जखमी
मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
Bangladesh Container Depot Fire: दक्षिण-पूर्व बांगलादेशातील अंतर्देशीय कंटेनर डेपोमध्ये भीषण आग लागली. त्यामुळे 35 जणांचा मृत्यू झाला. तर 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. शनिवारी रात्री चितगाव बंदर शहरापासून 40 किमी (25 मैल) अंतरावर असलेल्या सीताकुंडू येथे कंटेनरला आग लागल्याने हा अपघात झाला. अग्निशमन दलाचे अधिकारी फारुख हुसेन शिकदार यांनी रविवारी सकाळी सांगितले की, अग्निशमन दल अजूनही आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केलं आहे.
हा स्फोट इतका जोरदार होता की, आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. चटगावचे सिव्हिल सर्जन मोहम्मद इलियास हुसैन यांनी सांगितले की, स्फोटातील मृतांचा आकडा वाढू शकतो. कारण काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत करण्याचे आणि आपत्कालीन रक्तदानाचे आवाहन केले आहे. (हेही वाचा - Hapur Chemical Factory Fire: उत्तर प्रदेशमधील हापूरमध्ये केमिकल फॅक्टरीला आग; 8 कामगारांचा मृत्यू)
आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हायड्रोजन पेरॉक्साइडच्या कंटेनरमधून आग लागली असावी आणि ती इतर कंटेनरमध्ये पसरली असावी, असा संशय अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 2020 मध्येही चितगावच्या पतेंगा भागात कंटेनर डेपोमध्ये तेलाच्या टाकीचा स्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता.
डेपोला लागलेल्या आगीत आणि त्यानंतरच्या स्फोटात किमान 16 लोकांचा मृत्यू झाला, तर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह शेकडो जण जखमी झाले, असे डेली स्टारने वृत्त दिले आहे. ढाका ट्रिब्यूनने रेड क्रेसेंट यूथ चटगाव येथील आरोग्य आणि सेवा विभागाचे प्रमुख इस्तकुल इस्लाम यांना सांगितले की, "या घटनेत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी किमान 350 लोक सीएमसीएचमध्ये आहेत. जखमी झालेल्या काही रुग्णांची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे." अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांचाही या घटनेत मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.