World’s First AI Software Engineer: कॉग्निशनने लॉन्च केला जगातील पहिला एआय इंजिनीअर; लिहू शकतो कोड, बनवू शकतो सॉफ्टवेअर
डेव्हिन मानवी अभियंत्यांसोबत काम करण्यासाठी, रिअल-टाइम अपडेट्स प्रदान करण्यासाठी, फीडबॅक स्वीकारण्यासाठी आणि सॉफ्टवेअर डिझाइनवर सहयोग करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
World’s First AI Software Engineer: सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा (Artificial Intelligence) बोलबाला आहे. अनेक कंपन्या हे तंत्रज्ञान वापरत असून, यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या धोक्यात आल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. अशात आता जगातील पहिला एआय सॉफ्टवेअर इंजिनीअर लाँच करण्यात आला आहे. हा इंजिनीअर म्हणजेच हे एआय टूल इतके स्मार्ट आहे की, ते कोड लिहू शकते तसेच वेबसाइट आणि सॉफ्टवेअर तयार करू शकते. हा इंजिनीअर टेक कंपनी कॉग्निशनने तयार केला आहे व त्याला डेव्हिन असे नाव देण्यात आले आहे. डेव्हिन तुम्ही त्याला जे सांगाल ते करेल.
याबाबत कॉग्निशनने नमूद केले की, डेव्हिन हे एआय टूल भविष्यात मानवी अभियंत्यांची जागा घेण्यासाठी डिझाइन केलेले नाही. हे मानवांसोबत हाताने काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. म्हणजेच मानवी जीवन सुसह्य व्हावे यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.
याबाबत कॉग्निशनने सोशल मिडिया X वर लिहिले- 'आज आम्ही पहिला एआय सॉफ्टवेअर अभियंता 'डेव्हिन'चा परिचय करून देताना उत्सुक आहोत. डेव्हिनने आघाडीच्या एआय कंपन्यांमधील व्यावहारिक अभियांत्रिकी मुलाखती यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या आहेत. त्याने Upwork वर प्रत्यक्षात काम देखील केले आहे. डेव्हिन एक स्वायत्त एजंट आहे, जो स्वतःचे शेल, कोड एडिटर आणि वेब ब्राउझर वापरून अभियांत्रिकी कार्ये पार पाडतो.'
महत्वाचे म्हणजे, डेव्हिन माणसाप्रमाणे भविष्याचा विचार करू शकतो. गुंतागुंतीची कामे करण्याची योजना आखू शकते. तो हजारो निर्णय घेऊ शकतो आणि त्याच्या चुकांमधून शिकू शकतो. डेव्हिनकडे मानवी अभियंत्याला आवश्यक असलेली सर्व साधने आहेत. हे कोड एडिटर आणि ब्राउझर म्हणून काम करू शकते. डेव्हिनला SWE-Bench कोडिंग बेंचमार्कवर आधारित सॉफ्टवेअर अभियांत्रिकी कार्यासाठी सर्वात प्रगत म्हणून ओळखले गेले आहे. (हेही वाचा: India's first AI teacher: केरळमधील शाळेने लॉन्च केली भारतातील पहिली एआय शिक्षक 'आयरिस')
डेव्हिन मानवी अभियंत्यांसोबत काम करण्यासाठी, रिअल-टाइम अपडेट्स प्रदान करण्यासाठी, फीडबॅक स्वीकारण्यासाठी आणि सॉफ्टवेअर डिझाइनवर सहयोग करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे मानवांची कौशल्ये बदलण्याऐवजी वाढतील, तसेच यामुळे मानवी उत्पादकता आणि कार्यक्षमताही वाढेल.