WhatsApp New Feature: मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने सादर केले नवीन Accidental Delete फिचर; जाणून घ्या फायदा व कसे करेल कार्य

यासह डेस्कटॉप ऍप्लिकेशनच्या फिचरमध्ये भर घालत, व्हॉट्सअॅपने संपर्काच्या नावाने ग्रुप शोधण्यासाठी एक फिचर जारी केले आहे.

WhatsApp (PC- Pixabay)

मेटा-मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने (WhatsApp) सोमवारी ‘अॅक्सिडेंटल डिलीट’ (Accidental Delete) नावाचे फिचर सादर केले. तर आपण प्रत्येकानेच अशा समस्येचा सामना केला असेल, जिथे एखाद्या चुकीच्या व्यक्तीला किंवा चुकीच्या ग्रुपमध्ये एखादा मेसेज चुकून पाठवला जातो, मात्र ही गोष्ट लक्षात आल्यावर तो मेसज डिलीट करताना आपल्याकडून ‘डिलीट फॉर एव्हरीवन’वर क्लिक करण्याऐवजी ‘डिलीट फॉर मी’वर क्लिक होते. अशावेळी आपल्याला लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी, व्हॉट्सअॅपने अॅक्सिडेंटल डिलीट फीचर आणले आहे. हे फिचर वापरकर्त्यांना अॅक्सिडेंटल डिलीट मेसेज रिव्हर्स करण्यासाठी आणि तो प्रत्येकासाठी डिलीट करण्यासाठी पाच सेकंदांची विंडो प्रदान करतो. या फिचरद्वारे वापरकर्त्यांनी चुकून पाठवला गेलेला संदेश त्वरित पूर्ववत करून, तो प्रत्येकासाठी हटवण्यासाठी काही सेकंदाचा कालावधी देतो. अॅक्सिडेंटल डिलीट फिचर Android आणि iPhone डिव्हाइसवरील सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

गेल्या महिन्यात, मेसेजिंग प्लॅटफॉर्मने भारतात एक नवीन मेसेज युवरसेल्फ फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली होती. यासह डेस्कटॉप ऍप्लिकेशनच्या फिचरमध्ये भर घालत, व्हॉट्सअॅपने संपर्काच्या नावाने ग्रुप शोधण्यासाठी एक फिचर जारी केले आहे. या फीचरच्या मदतीने आता व्हॉट्सअॅप डेस्कटॉप यूजर्ससाठी कोणताही ग्रुप शोधणे सोपे होणार आहे. (हेही वाचा: सॅमसंगने लॉन्च केले दोन परवडणारे स्मार्टफोन; Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e ची किंमत व फीचर्स जाणून घ्या)

दरम्यान, व्हॉट्सअॅप अशा एका उत्तम फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे युजर्ससाठी मेसेजची प्रायव्हसी अजून चांगली होईल. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या युजर्सना व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये ‘व्ह्यू वन्स’ मेसेज म्हणून फोटो पाठवण्याची सुविधा आहे, जर कोणी असा मेसेज किंवा हा फोटो पाहिला तर तो लगेच गायब होतो. आता मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपच्या फीचर ट्रॅकरने अँड्रॉईडवर ‘व्ह्यू वन्स’ टेक्स्ट मेसेज पाठवण्याच्या क्षमतेवर काम सुरू केले आहे. लवकरच हे फिचर वापरकर्त्यांसाठी रोल आउट केले जाईल.