WhatsApp देत आहे 1000GB फुकटात डेटा? जाणून घ्या सत्य
या मेसेजद्वारे युजर्सला 1000GB डेटा फुकटात मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तुम्हाला सुद्धा हा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा.
सध्या व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजद्वारे युजर्सला 1000GB डेटा फुकटात मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तुम्हाला सुद्धा हा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा. कारण फुकटात डेटा मिळणार असल्याचा मेसेज खोटा असून तुमची फसवणुक होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या व्हॉट्सअॅपवर विविध मेसेज व्हायरल होत असून हा एका प्रकारचा घोटाळा असल्याची सुचना वारंवार युजर्सला दिली जाते.
व्हॉट्सअॅपने याच वर्षी त्यांचा 10 वा वाढदिवस साजरा केला आहे. याचाच फायदा घेत सोशल मीडियात व्हॉट्सअॅपकडून 1000GB डेटा युजर्सला फ्री देण्यात येत असल्याचा मेसेज पाठवला जात आहे. तसेच आलेल्या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली असून फ्री डेटा मिळवण्यासाठी त्यावर क्लिक करा अशी सुचना दिली जाते. जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईलच्या ब्राउजरमध्ये एक नवी विंडो सुरु होऊन त्यामध्ये व्हॉट्सअॅपने 10 वर्ष पुर्ण केल्यामुळे तुम्हाला फुकटात डेटा मिळत असल्याचे सांगितले जाते. तसेच व्हॉट्सअॅपची ही ऑफर काही मर्यादेपूर्तीच असून लवकरच क्लेम करा असे सुद्धा सांगण्यात येते.(WhatsApp Pay: या वर्षाअखेरीस भारतात लाँच होणार 'WhatsApp Pay', व्हॉट्सअॅपच्या ग्लोबल हेड ने दिली माहिती)
तसेच लिंक सुरु झाल्यास तेथे युजर्सला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. त्यानंतर फुकटात डेटा मिळवण्यासाठी तो मेसेज अन्य 30 जणांना फॉरवर्ड करा अशी सुचना पुन्हा दिली जाते. परंतु सायबर सिक्युरिटी कंपनी ESET यांनी असे म्हटले आहे की, व्हायरल झालेला हा मेसेज खोटा असून युदर्सने मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करु नये. तसेच आलेला हा मेसेज व्हॉट्सअॅपकडून पाठवण्यात आलेला नसल्याची खबरदारी युजर्सने घ्यावी असे सुद्धा सांगण्यात आले आहे.