WhatsApp Alert: व्हॉट्सअॅपवर मोठा आरोप; वापर होत नसताना करत आहे मायक्रोफोन एक्सेस, IT Ministry करणार चौकशी

या ट्विटर अभियंत्याने असा दावा केला की, तो झोपेत असताना त्याचे व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन सतत मायक्रोफोन वापरत होते.

WhatsApp (PC- Pixabay)

सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या जमान्यात प्रत्येकजण मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) वापर करतो. पण आता व्हॉट्सअॅप यूजर्सच्या प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अॅप वापरात नसतानाही व्हॉट्सअॅपवर वापरकर्त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या मायक्रोफोनमध्ये प्रवेश केल्याचा आरोप होत आहे. अहवालानुसार, अॅपने बॅकग्राउंडमध्ये मायक्रोफोनच्या आत प्रवेश करणे सुरू ठेवले आहे, ज्यामुळे वापरकर्त्याच्या गोपनीयतेबद्दल चिंता निर्माण होत आहे.

याआधी ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती. कंपनीने हा दावा फेटाळला असला तरी, आता युजर्सच्या गोपनीयतेच्या तक्रारी लक्षात घेऊन सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

व्हॉट्सअॅपबाबत अनेक वापरकर्त्यांचा आरोप आहे की ते अॅप वापरत नसतानाही प्लॅटफॉर्म त्यांच्या मायक्रोफोनमध्ये प्रवेश करत आहे. ही समस्या अनेक वापरकर्त्यांनी पाहिली आहे. स्मार्टफोनमधील प्रायव्हसी इंडीकेटर, मायक्रोफोन आणि कॅमेरा एक्सेस केल्यावर एक ग्रीन नोटिफेशन देतो, जो एक युजर अलर्ट म्हणून काम करतो. अशा प्रकारे यूजर्सना व्हॉट्सअॅपच्या मायक्रोफोन ऍक्सेसची माहिती मिळाली. त्याद्वारे वापरकर्ते व्हॉट्स अॅप वापरत नसतानाही अॅप त्यांच्या फोनवर मायक्रोफोन वापरत असल्याचे आढळले.

ट्विटरवर एका ट्विटर अभियंत्याची पोस्ट शेअर करून मस्कने व्हॉट्सअॅपच्या मायक्रोफोन ऍक्सेसबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या ट्विटर अभियंत्याने असा दावा केला की, तो झोपेत असताना त्याचे व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन सतत मायक्रोफोन वापरत होते. या अभियंत्याने याचा स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे ट्विट व्हायरल झाले असून ते आतापर्यंत 65 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.

आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्हॉट्सअॅपच्या गोपनीयतेच्या चिंतेची चौकशी करण्यास सांगितले आहे. या अभियंत्याच्या ट्विटला उत्तर देताना चंद्रशेखर म्हणाले की, ‘हे अस्वीकार्य गोपनीयतेचे उल्लंघन आहे. फोन वापरात नसताना व्हॉट्सअॅपने स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या मायक्रोफोनमध्ये प्रवेश केल्याच्या दाव्याची सरकार चौकशी करेल.’ (हेही वाचा: Elon Musk On Twitter New Features: लवकरच ट्विटरवर येणार व्हॉईस आणि व्हिडिओ चॅटची सुविधा)

या ट्विटर इंजिनिअरची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर व्हॉट्सअॅपने प्रतिक्रिया दिली आहे. व्हॉट्सअॅपने सांगितले की ते गेल्या 24 तासांपासून या ट्विटर अभियंत्याच्या संपर्कात आहेत. व्हॉट्सअॅपने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्हाला विश्वास आहे की हा एक Android बग आहे जो त्यांच्या गोपनीयता डॅशबोर्डमधील माहितीचे चुकीचे वर्णन करतो. त्यांनी गुगलला तपास करून त्याचे निराकरण करण्यास सांगितले आहे.