Virtual ATM: आता पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाण्याची गरज नाही; अवघ्या एका OTP वर जवळच्या दुकानातून प्राप्त करू शकता कॅश, जाणून घ्या कसे
ही सेवा आयडीबीआय (IDBI) बँकेत 6 महिन्यांपासून यशस्वीपणे चालवली जात आहे. फिनटेक फर्मने इंडियन बँक, जम्मू आणि काश्मीर बँक आणि करूर वैश्य बँकेशीही करार केला आहे. सध्या ही सेवा चंदीगड, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि मुंबई येथे उपलब्ध आहे.
Virtual ATM: आता, तुम्हाला रोख रक्कम (Cash) काढण्यासाठी एटीएम किंवा बँकेच्या शाखांना भेट देण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचा स्मार्टफोन वापरून जवळपासच्या दुकानांमधून पैसे काढू शकता. आता एटीएमचा पर्याय व्हर्च्युअल एटीएमच्या (Virtual ATM) स्वरूपात आला आहे. म्हणजेच तुम्हाला पैसे काढण्यासाठी एटीएमच्या शोधात जायची गरज नाही. तुम्ही फक्त एका ओटीपीच्या (OTP) मदतीने जवळपासच्या कोणत्याही दुकानातून पैसे काढू शकाल. यासाठी तुम्हाला फक्त स्मार्टफोन, मोबाईल बँकिंग ॲप आणि इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असेल.
सध्या देशात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) इतका लोकप्रिय झाला आहे की, आजकाल अनेकजण बाहेर पडताना रोख पैसे घेऊन जात नाहीत. युपीआयद्वारे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यांची आवश्यकता असते. मात्र जिथे युपीआय चालत नाही किंवा प्रवास करताना, दुर्गम भागात जेव्हा तुम्हाला तात्काळ रोख रकमेची गरज असते तेव्हा तुम्हाला जवळच्या एटीएम जाणे भाग पडते. यासाठी तुमचे डेबिट कार्ड स्वतःकडे असणे गरजेचे आहे. मात्र आता ही समस्याही दूर होणार आहे. आता पैसे काढण्यासाठीही तुम्हाला एटीएममध्ये जाण्याची गरज नाही.
तर चंदीगडच्या फिनटेक कंपनीने- Paymart India Pvt Ltd ने व्हर्च्युअल, कार्डलेस आणि हार्डवेअर-लेस रोख पैसे काढण्याची सेवा आणली आहे. पेमार्ट इंडियाचे संस्थापक आणि सीईओ अमित नारंग या सेवेला व्हर्च्युअल एटीएम असे संबोधतात. हे व्हर्च्युअल एटीएम वापरून पैसे काढण्यासाठी तुम्हाला फक्त स्मार्टफोन, मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशन आणि इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. (हेही वाचा: Surya Ghar Muft Bijli Yojana: देशातील 1 कोटी घरांना मिळणार 300 युनिट वीज मोफत; PM Narendra Modi यांनी सुरु केली पीएम सूर्य घर मोफत वीज योजना', जाणून घ्या सविस्तर)
जाणून घ्या व्हर्च्युअल एटीएमद्वारे कसे पैसे काढू शकाल-
सर्वात प्रथम तुमच्या मोबाइल बँकिंग ॲपद्वारे तुमच्या बँकेकडे रोख पैसे काढण्याची विनंती पाठवा. लक्षात घ्या तुमच्या मोबाइल बँकिंग ॲपमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमचा फोन नंबर बँकेकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
तुमच्या विनंतीनंतर तुमची बँक एक ओटीपी जनरेट करेल आणि तो तुमच्या नोंदणीकृत क्रमांकाद्वारे तुमच्यासोबत शेअर केला जाईल.
हा ओटीपी तुम्हाला Paymart वर नोंदणीकृत असलेल्या दुकानात दाखवावा लागेल. ओटीपी तपासल्यानंतर दुकानदार तुम्हाला रोख रक्कम देईल.
पेमार्टशी संबंधित दुकानदारांची यादी तुमच्या मोबाइल बँकिंग ॲपवर दिसेल. यासोबतच त्यांची नावे, ठिकाणे आणि फोन नंबरही दिसतील. पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड, एटीएम मशीन किंवा यूपीआयची गरज भासणार नाही. ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकाकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. या सुविधेचा वापर करून वापरकर्ता किमान 100 रुपये आणि जास्तीत जास्त 2,000 रुपये प्रति व्यवहार काढू शकतो. व्हर्च्युअल एटीएममधून पैसे काढण्यासाठी कमाल मर्यादा 10,000 रुपये प्रति महिना ठेवली आहे. ही सेवा दुर्गम भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
ही सेवा आयडीबीआय (IDBI) बँकेत 6 महिन्यांपासून यशस्वीपणे चालवली जात आहे. फिनटेक फर्मने इंडियन बँक, जम्मू आणि काश्मीर बँक आणि करूर वैश्य बँकेशीही करार केला आहे. सध्या ही सेवा चंदीगड, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि मुंबई येथे उपलब्ध आहे. मार्चपासून संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)