UPI International: आता PhonePe द्वारे परदेशात करू शकता ऑनलाइन पेमेंट; कंपनीने सुरु केली युपीआय आंतरराष्ट्रीय सेवा, जाणून घ्या सविस्तर

हे फीचर परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आता तुम्ही परदेशात प्रवास करताना फोनपे अॅपवर युपीआयद्वारे परदेशी व्यापाऱ्यांना सहज पेमेंट करू शकाल.

PhonePe (Photo Credits-Twitter)

भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपे (PhonePe) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. फोनपेमध्ये जोडलेल्या या नव्या फिचरच्या मदतीने, वापरकर्ते केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्ये प्रवास करताना युपीआय (UPI) द्वारे सहजपणे पेमेंट करू शकतील. याचा अर्थ असा की, फोनपे आता तुम्हाला परदेशात (युपीआय इंटरनॅशनल- UPI International) व्यवहार करण्यातही मदत करेल.

फोनपे ही भारतामधील पहिली कंपनी बनली आहे जिने युजर्ससाठी हे उपयुक्त फीचर लॉन्च केले आहे. हे फीचर परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आता तुम्ही परदेशात प्रवास करताना फोनपे अॅपवर युपीआयद्वारे परदेशी व्यापाऱ्यांना सहज पेमेंट करू शकाल.

ज्याप्रकारे तुमच्या आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डच्या वापरानंतर तुमच्या बँक खात्यातून परकीय चलन कापले जाते, त्याच पद्धतीने हा व्यवहार होईल. फोनपेनुसार, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई, मॉरिशस, सिंगापूर, भूतान आणि नेपाळमधील स्थानिक क्यूआर कोड (QR Code) असलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय व्यापारी आउटलेट्समध्ये या सुविधेचा लाभ घेता येईल. आगामी काळात ही सेवा इतर देशांतही सुरु होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: केंद्र सरकारची मोठी कारवाई! मनी लाँड्रिंगप्रकरणी चायनीजसह 232 परदेशी अॅप्स ब्लॉक)

ही सुविधा सुरू झाल्यानंतर परदेशात पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा फॉरेक्स कार्डची गरज भासणार नाही. दरम्यान, कोणत्याही मोबाईल पेमेंट अॅपने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या देशांतर्गत वापरकर्त्यांना सेवा देण्यास सुरुवात करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आधीपासून चीनी कंपनी WeChat Pay आणि Alipay देखील अनेक देशांमध्ये त्यांच्या ग्राहकांना अशीच सेवा देत आहेत. भारतामधील युपीआय मार्केटमध्ये, फोनपे, गुगल पे, पेटीएम आणि सीआरडी पे (CRD Pay) या चार अॅप्सचा एकूण युपीआय मार्केट शेअर 96.4% आहे. भारतातील एकूण युपीआय व्यवहारांपैकी सुमारे 49% वाटा फोनपेचा आहे.