Twitter Blue: ट्विटर युजर्सना धक्का; ब्लू टिकच्या किमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

मात्र आता ही किंमत वाढली आहे. सबस्क्रिप्शन आधारित ट्विटर ब्लू सोबत, ब्लू टिक देखील उपलब्ध आहे.

Twitter logo (Photo courtesy: Twitter)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने (Twitter) आपल्या यूजर्सला अजून एक धक्का दिला आहे. जर तुम्ही ट्विटर वापरत असाल आणि तुमच्या खात्यावर ब्लू टिक (Blue Tick Subscription) असेल किंवा तुम्हाला ब्लू टिक हवी असेल तर आता तुम्हाला ते खाते वापरण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. कंपनीने युजर्ससाठी ब्लू टिकची किंमत वाढवली आहे. आतापासून, यासाठी Android आणि ISO वापरकर्त्यांना प्रत्येक महिन्याला $11 खर्च करावे लागतील.

याआधी घोषणा करण्यात आली होती की, ट्विटर ब्लू प्लॅनसाठी, दरमहा $8 किंवा $84 वार्षिक खर्च करावे लागतील. मात्र आता ही किंमत वाढली आहे. सबस्क्रिप्शन आधारित ट्विटर ब्लू सोबत, ब्लू टिक देखील उपलब्ध आहे. ब्लू टिकसाठी पैसे देणाऱ्या युजरच्या खात्यासमोर व्हेरिफिकेशन टिक दिली जाईल.

ही योजना सध्या अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासाठी लागू आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने असेही सांगितले आहे की, तुम्ही सेवा अटींचे उल्लंघन केल्यास किंवा तुमचे खाते निलंबित केले गेले असल्यास, परतावा न देता कोणत्याही वेळी तुमच्या खात्याची ब्लू टिक काढण्याचा अधिकार कंपनी आपल्याकडे राखून ठेवते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सांगितले की, ते ट्विटर व्हेरिफिकेशन फॉर ऑर्गनायझेशन नावाची एक नवीन सेवा देखील चालवत आहे. ट्विटरवरील व्यावसायिक संस्थांसाठी ही सेवा आहे, जी अधिकृत व्यवसाय खात्यावर गोल्ड चेकमार्क प्रदान करते. (हेही वाचा: 'इंस्टाग्राम लोकांना उदास बनवते, तर ट्विटरमुळे लोकांना राग येतो'- Elon Musk)

याआधी ट्विटरने राजकारणी, लोकप्रिय व्यक्ती, प्रमुख पत्रकार आणि इतर लोकप्रिय कलाकार यांनाचा ब्लू टिक प्रदान केली होती. परंतु आता एलोन मस्क यांनी सबस्क्रिप्शन पर्यायाचे नियम बदलले आहेत. नवीन नियमांनुसार, जो कोणी वापरकर्ता या बॅजसाठी पैसे देण्यास तयार असेल त्याला ब्लू बॅज दिला जाईल.