TikTok Layoffs: टिकटॉकने बंद केला भारतामधील संपूर्ण व्यवसाय; सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकले

टिकटॉकच्या माध्यमातून अमेरिकन युजर्सचा डेटा चीन सरकारकडे जाऊ शकतो, अशी भीती अमेरिकेला आहे.

TikTok (Photo Credits-Gettey Images)

सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरु आहे. आता त्यामध्ये ByteDance च्या मालकीचे शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉक (Tiktok) देखील सामील झाले आहे. काही सूत्रांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला, टिकटॉकने आपल्या संपूर्ण भारतीय टीमला म्हणजे टिकटॉकमध्ये काम करणा-या सर्व भारतीयांना काढून टाकले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला 40 लोकांना टिकटॉककडून पिंक स्लिप देण्यात आल्याचे अहवालावरून कळले आहे. यासोबतच टिकटॉकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असेही सांगण्यात आले आहे की, त्यांना कंपनीतून काढून टाकले जात असेल तर कंपनी त्यांना 9 महिन्यांचा पगार देईल.

या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर ईटीला माहिती दिली की, टिकटॉक इंडियाच्या कर्मचाऱ्यांना 28 फेब्रुवारी हा त्यांचा शेवटचा दिवस असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना इतर संधी म्हणजे नवीन नोकरी शोधण्यासाठी कंपनीकडून काही फायदे दिले जातील. कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितले की, चीनी अॅप्सबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे कंपनी भारतात आपले कामकाज पुन्हा सुरू करू शकत नाही. परंतु ByteDance ने गुरुवारपर्यंत या प्रकरणी कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. (हेही वाचा: Yahoo Layoff: याहू मध्ये 17 हजार कर्मचार्‍यांना कामावरून हटवण्याची तयारी)

सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जून 2020 मध्ये टिकटॉकसह सुमारे 300 इतर चिनी अॅप्सवर बंदी घातली होती, त्यानंतर कंपनीच्या भारत कार्यालयातील बरेच कर्मचारी दुबई आणि ब्राझीलमध्ये काम करत होते. टिकटॉकवर भारतात बंदी घालण्यात आली आहे, त्यावेळी कंपनीचे 200 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते होते. भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर मेटाच्या फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अॅप इंस्टाग्रामने वापरकर्त्यांसाठी रील्स फीचर् सादर केले.

दरम्यान, आता युनायटेड स्टेट्समध्ये देखील टिकटॉकचा वापर मर्यादित केला जात आहे. टिकटॉकच्या माध्यमातून अमेरिकन युजर्सचा डेटा चीन सरकारकडे जाऊ शकतो, अशी भीती अमेरिकेला आहे. हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीने युनायटेड स्टेट्समध्ये टिकटॉकचा वापर रोखण्याच्या उद्देशाने या महिन्यात मतदान करण्याची योजना आखली आहे.