नवीन सूचनांमुळे WhatsApp चे कामकाज व वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीवर परिणाम होणार नाही; नागरिकांच्या Right of Privacy हक्काचा आदर करण्यास सरकार कटिबद्ध- Government of India
यामध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने व्यक्तिगत गोपनीयतेला (Right of Privacy) मुलभूत हक्काचा दर्जा दिला असून, सर्व नागरिकांच्या या हक्काचा आदर करण्यास सरकार कटिबद्ध आहे
भारत आणि विविध सोशल मिडिया यांच्यामध्ये चालू असणाऱ्या वादामध्ये आज सरकारकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने व्यक्तिगत गोपनीयतेला (Right of Privacy) मुलभूत हक्काचा दर्जा दिला असून, सर्व नागरिकांच्या या हक्काचा आदर करण्यास सरकार कटिबद्ध आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटले आहे की, ‘भारत सरकार देशातील सर्व नागरिकांच्या व्यक्तिगत गोपनीयतेच्या हक्काच्या सुनिश्चिततेसाठी कटिबद्ध आहे. मात्र त्याच वेळी, कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राहील याची खात्री करून घेणे ही देखील सरकारची जबाबदारी आहे.’ मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पुढे सांगितले की, ‘भारताने प्रस्तावित केलेले कोणतेही उपाय व्हॉट्सअॅप (WhatsApp) मंचाच्या नेहमीच्या परिचालनावर कोणत्याही प्रकारे परिणाम करणारे नाहीत आणि मंचाचा वापर करताना सर्वसामान्य वापरकर्त्यांना कोणतेही वेगळेपण जाणवणार नाही.’
‘सर्व स्थापित न्यायिक वचनांनुसार, व्यक्तिगत गोपनीयता राखण्याच्या हक्कासकट कोणताही मुलभूत हक्क परिपूर्ण नाही आणि त्यावर रास्त निर्बंध घालता येऊ शकतात. सोशल मीडिया इंटरमिडीअरी यांनी संदेशाचे उगमस्थान जाहीर करण्याची आवश्यकता हे अशाच रास्त निर्बंधाचे उदाहरण आहे. जेव्हा सोशल मीडिया इंटरमिडीअरी मार्गदर्शक तत्वांचा नियम 4 (2) प्रमाणाच्या कसोटीवर तपासला जातो, तेव्हा ती चाचणी देखील पूर्ण होते. या चाचणीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखादी कमी प्रमाणात परिणाम करणारी उपाययोजना उपलब्ध आहे का हे तपासणे.
मार्गदर्शक तत्वांनुसार, जेव्हा इतर उपाय निरुपयोगी सिद्ध होतात फक्त अशाच वेळी माहितीच्या उगमकर्त्याचा शोध घेता येईल कारण तोच हाती घ्यायचा शेवटचा उपाय म्हणून शिल्लक असतो. तसेच, कायद्याचे पुरेसे संरक्षण मिळवून त्यानंतर कायद्याने मंजूर केलेल्या प्रक्रियेच्या माध्यमातूनच अशी माहिती मिळविता येईल.
हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे की वरील मार्गदर्शक तत्त्वाच्या नियम 4(2) अन्वये संदेश उत्पत्तीकर्त्याचा शोध लावण्याचा आदेश केवळ प्रतिबंध, तपास, शिक्षा तसेच सार्वभौमत्वाशी संबंधित गुन्हा, भारताची अखंडता आणि सुरक्षितता इत्यादी उद्देशानेच मंजूर केला जाईल. बलात्कार, लैंगिक सुस्पष्ट सामग्री किंवा बाल लैंगिक अत्याचार याला चिथावणी देणाऱ्या गुन्ह्यासंबंधी सार्वजनिक आदेशात पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा असू शकते.
अशा प्रकारच्या गुन्ह्यास कारणीभूत ठरणाऱ्या खोडसाळपणाची सुरूवात कोणी केली हे शोधून शिक्षा करणे हे जनतेच्या हिताचे आहे. हिंसाचार आणि दंगली इत्यादी प्रकरणांमध्ये वारंवार व्हॉट्सअॅप संदेश प्रसारित केले जातात आणि ज्यांची सामग्री आधीपासून सार्वजनिक डोमेनमध्ये आहे त्याची पुनरावृत्ती कशी केली जाते हे आम्ही नाकारू शकत नाही. म्हणून याची सुरुवात कोणी केली त्याची भूमिका खूप महत्वाची आहे.
ऑक्टोबर 2018 नंतर, गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात प्रथम जनक शोधून काढण्याच्या आवश्यकतेबाबत व्हॉट्सअॅपने भारत सरकारकडे कोणताही लेखी आक्षेप नोंदवला नाही. त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठीचा वेळ वाढविण्यासाठी मुदत मागितली आहे परंतु शोध घेणे शक्य नाही असा कोणताही औपचारिक संदर्भ दिलेला नाही.
कायद्यानुसार देशातील प्रत्येक कृती कायद्याला पाळून असते. या मार्गदर्शक तत्वांचे पालन करायला व्हॉट्सअॅपचा नकार म्हणजे कायद्याचे उल्लंघन करण्याचे स्पष्ट कार्य आहे याबाबत शंका नक्कीच घेतली जाऊ शकत नाही. एका टप्प्यावर, व्हॉट्सअॅप एक गोपनीयता धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यामध्ये ती विपणन आणि जाहिरातीच्या उद्देशाने आपल्या सर्व वापरकर्त्याचा डेटा त्याच्या मूळ कंपनी, फेसबुकवर सामायिक करेल.
दुसरीकडे, कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आणि बनावट बातम्यांचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोशल मीडिया इंटरमिडीअरी मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिनियमास नकार देण्यासाठी व्हॉट्सअॅप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्लॅटफॉर्मवरील मेसेजेस एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असल्याचा अपवाद पुढे करत इंटर मिडीएटरी गाईडलाईन अधिनियमित करण्यास नकार दिल्याचे व्हॉट्सअपने समर्थन केले आहे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, परिचालन पद्धती कुठलीही असो, प्रत्येक महत्त्वपूर्ण सोशल मीडिया इंटर मिडीएटरीसाठी माहितीच्या मूळ जनकाचा शोध घेण्याचा नियम अनिवार्य आहे. (हेही वाचा: WhatsApp लवकरच सादर करेल खास फिचर; मोबाईल शिवाय Desktop वर करता येईल लॉगइन)
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘एन्क्रिप्शन कायम राहील की नाही यावर संपूर्ण वादविवाद अनाठायी आहे. एनक्रिप्शन तंत्रज्ञान किंवा इतर काही तंत्रज्ञान वापरुन गोपनीयतेच्या अधिकाराची खातरजमा हे पूर्णपणे सोशल मीडिया इंटर मिडीएटरीचे कार्यक्षेत्र आहे. केंद्र सरकार आपल्या सर्व नागरिकांना गोपनीयतेचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी तसेच सार्वजनिक सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा राखण्यासाठी आवश्यक साधन आणि माहिती मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे. एन्क्रिप्शनद्वारे किंवा अन्य मार्गाने तांत्रिक उपाय शोधण्याची जबाबदारी व्हॉट्सअॅपची आहे.’