Space Tourism: स्पेसफ्लाइट कंपनी Virgin Galactic सुरु करत आहे अंतराळ पर्यटन सेवा; जाणून घ्या एका तिकीटाची किंमत
त्याच वर्षी त्यांनी प्रथमच स्पेस प्लेन तयार करण्याचा त्यांचा मानस जाहीर केला. सन 2007 पर्यंत ते अंतराळात व्यावसायिक विमानसेवा सुरू करतील असा त्यांचा विश्वास होता.
अंतराळ पर्यटन (Space Tourism) कंपनी 'व्हर्जिन गॅलेक्टिक' (Virgin Galactic) आपली पहिली व्यावसायिक उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले की, ही सेवा या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. अहवालानुसार, व्हर्जिन गॅलेक्टिकचे पहिले अंतराळ पर्यटक उड्डाण 29 जून रोजी टेक ऑफ करणार आहे. हे व्यावसायिक उड्डाण 'गॅलेक्टिक 01' म्हणून ओळखले जाईल. दुसरे व्यावसायिक अंतराळ उड्डाण 'गॅलेक्टिक 02' ऑगस्ट 2023 च्या सुरुवातीला सुरू होईल. त्यानंतर दर महिन्याला अंतराळ उड्डाण सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या या घोषणेपासून, व्हर्जिन गॅलेक्टिकचे शेअर्स 40 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. 'व्हर्जिन गॅलेक्टिक'चे म्हणणे आहे की, त्यांचे पहिले उड्डाण सामान्य लोकांसाठीचे उड्डाण नसून एक वैज्ञानिक संशोधन मिशन असेल. यात इटालियन हवाई दल आणि इटलीच्या राष्ट्रीय संशोधन परिषदेचे प्रत्येकी तीन क्रू सदस्य असतील. 'गॅलेक्टिक-2' मध्ये सामान्य पर्यटक प्रवास करतील.
कंपनीचे मालक, सर रिचर्ड ब्रॅन्सन (Richard Branson) यांनी 2004 मध्ये व्हर्जिन गॅलेक्टिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी प्रथमच स्पेस प्लेन तयार करण्याचा त्यांचा मानस जाहीर केला. सन 2007 पर्यंत ते अंतराळात व्यावसायिक विमानसेवा सुरू करतील असा त्यांचा विश्वास होता, मात्र अनेक तांत्रिक अडचणी आणि चाचणीदरम्यान झालेल्या अपघातांमुळे कंपनीच्या हा प्रकल्पाला पूर्णत्वास येण्यास वेळ लागला.
त्यानंतर 2021 मध्ये कंपनीचे मालक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी त्यांचे वैयक्तिक रॉकेट 'युनिटी'ने प्रथमच अंतराळात प्रवास केला. सुमारे पाऊण तास हा प्रवास पूर्ण करून ते पृथ्वीवर परतले. ब्रॅन्सन व्यतिरिक्त, दोन पायलट आणि तीन गॅलेक्टिक कर्मचारी देखील या मोहिमेत सामील होते. या मिशनच्या यशानंतर अवकाशात पर्यटन सुरु करण्याची शर्यत सुरू झाली. स्पेस एक्स, ब्लू ओरिजिन्स सारख्या कंपन्याही त्यांच्या अंतराळ पर्यटन प्रकल्पांवर काम करत आहेत. (हेही वाचा: अंतराळातील मूत्र आणि घामातून प्राप्त केले पिण्यायोग्य पाणी; NASA च्या अंतराळवीरांचे मोठे यश, जाणून घ्या सविस्तर
अंतराळ पर्यटनाच्या घोषणेपासून व्हर्जिन गॅलेक्टिकने आतापर्यंत 800 पेक्षा जास्त तिकिटे विकली आहेत. एका तिकिटाची किंमत सुमारे $4,50,000 (3,68,88,075 कोटी रुपये) ठेवण्यात आली आहे. गॅलेक्टिक फ्लाइटची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, प्रवाशांना विमानाच्या आतून अंतराळ पाहता येईल.