Solar Eclipse 2022: यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 30 एप्रिलला; पहा ग्रहणाची वेळ काय? सुतक काळ असणार का?
त्यामध्ये 2 चंद्रग्रहणं आणि 2 सूर्यग्रहणं असणार आहेत. 30 एप्रिलचं सूर्यग्रहण भारतामधून दिसणार नसलं तरीही 16 मे दिवशी चंद्र ग्रहण भारतीयांना पाहता येणार आहे.
यंदा 2022 वर्षामधील पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan) 30 एप्रिल दिवशी होणार आहे. भारतामधून हे सूर्यग्रहण पाहता येणार नाही. जगात अमेरिकेचा काही भाग, पॅसिफिक ओशन, अटलांटिक आणि अंटार्टिकच्या काही भागातून दिसणार आहे. सूर्यग्रहण ही सामान्य खगोलीय घटना आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून सूर्यग्रहण (Solar Eclipse) होते. ही सामान्य अवकाशीय घटना असली तरीही हिंदू धर्मीयांच्या याच्याशी काही धारणा जुडलेल्या आहेत. काही धार्मिक नियम या काळात पाळले जातात त्यामुळे जाणून घ्या भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहणाची नेमकी वेळ काय आहे?
भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहणाची वेळ काय?
भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण 30 एप्रिल दिवशी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 4 वाजून 7 मिनिटांनी संपणार आहे. भारतामधून हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे ग्रहणाचे वेध, सुतककाळ पाळण्याचे बंधन नसेल.
दरम्यान तुम्हांला ग्रहण भारतात दिसणार नसलं तरीही ऑनलाईन अनेक खगोलप्रेमींसाठी लाईव्ह स्ट्रिमिंग केले जातं. ऑनलाईन ग्रहणाच्या काळात बदलत्या स्थिती तुम्ही जरूर पाहू शकता.
ग्रहण कधीही थेट डोळ्यांनी बघू नये. त्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं, ग्लासवेअर, टेलिस्कोप, बॉक्स प्रोजेक्टर वापरण्याचे आवाहन केले जाते.
यंदाच्या वर्षी एकूण 4 ग्रहणं होणार आहेत. त्यामध्ये 2 चंद्रग्रहणं आणि 2 सूर्यग्रहणं असणार आहेत. 30 एप्रिलचं सूर्यग्रहण भारतामधून दिसणार नसलं तरीही 16 मे दिवशी चंद्र ग्रहण भारतीयांना पाहता येणार आहे. Eclipse 2022: यंदाच्या वर्षी कधी लागणार सूर्य आणि चंद्र ग्रहण? तारखा घ्या जाणून .
ग्रहणाच्या दृश्यमानतेनुसार त्याच्या प्रभावाचा अंदाज व्यक्त केला जातो. ज्योतिषांच्या मते, जिथे ग्रहण दिसते, तिथल्या लोकांवर त्याचा परिणाम होतो. तरच त्याचा सुतक काळ वैध ठरतो. जर ग्रहण भारतात दिसले तर सुतक कालावधी वैध आहे. जर ग्रहण भारतात दिसत नसेल तर सुतक कालावधी वैध नाही. धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण शुभ मानले जात नाही. यावेळी मांगलिक कामे करण्यास मनाई आहे. मंदिराचे दरवाजेही बंद ठेवले जातात. ग्रहणानंतर घर स्वच्छ केले जाते.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. आमचा कुणाच्या भावना दुखावण्याचा, अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही.