Chandra Grahan 2026: 28 ऑगस्टच्या आंशिक चंद्रग्रहणात चंद्र दिसणार लालबुंद; भारतातून कसं, कधी, कुठे पहाल?
२७-२८ ऑगस्ट २०२६ रोजी एक अत्यंत गडद आंशिक चंद्रग्रहण होणार असून, यामध्ये चंद्राचा तब्बल ९६.२ टक्के भाग पृथ्वीच्या सावलीने झाकला जाणार आहे. हे ग्रहण उत्तर-दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडांतून दिसणार आहे.
यंदाच्या वर्षातील शेवटचं ग्रहण आंशिक चंद्रग्रहण (Partial Lunar Eclipse) आहे. श्रावण पौर्णिमेला म्हणजेच 27-28 ऑगस्ट 2026 ला हे आंशिक चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण असामान्यरित्या गडद असणार असून, यामध्ये चंद्राचा तब्बल 96.2% टक्के भाग पृथ्वीच्या गडद सावलीने झाकला जाणार आहे. त्यामुळे हे ग्रहण जवळपास पूर्ण ग्रहणासारखेच भासणार आहे. दरम्यान भारतात हे ग्रहण दिसणार नसले तरीही खगोलशास्त्रात रूची असलेले अनेकजण ऑनलाईन माध्यमातून हा अद्भूत नजारा नक्कीच पाहू शकतात.
आंशिक चंद्रग्रहण कधी आणि कसे होणार?
27-28 ऑगस्टचे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्र असलेल्या 'स्टर्जन मून'च्या रात्री होणार आहे. 28 ऑगस्ट 2026 रोजी चंद्राच्या आरोहण बिंदूवर हे आंशिक चंद्रग्रहण होणार असून, त्याची उंबरल तीव्रता 0.9319 इतकी असेल. ग्रहणाचा आंशिक टप्पा जवळपास साडेतीन तास (198 मिनिटे) चालणार असून, संपूर्ण पेनम्ब्रल टप्पा सुमारे साडेपाच तास टिकेल. हे अत्यंत गडद,96.2 टक्के आंशिक चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका तसेच युरोप व आफ्रिकेच्या काही भागांतील रहिवाशांना दिसणार आहे.
भारतात आंशिक चंद्रग्रहण दिसणार का?
नासाच्या माहितीनुसार, हे ग्रहण अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि पश्चिम आशियातून दिसणार आहे. या ग्रहणाची जागतिक वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळच्या सुमारास येते, त्यामुळे भारतात त्या वेळी दिवस असल्याने चंद्र क्षितिजाखाली असेल. परिणामी, हे ग्रहण भारतातून प्रत्यक्षात दिसणे शक्य होणार नाही. भारतीय खगोलप्रेमींसाठी यापूर्वीच 7 सप्टेंबर 2025 रोजी पूर्ण चंद्रग्रहण आणि 3 मार्च 2026 रोजी आणखी एक पूर्ण चंद्रग्रहण दिसले होते. पुढील भारतातून दिसणारे ग्रहण काहीसे नंतर येणार आहे. नक्की वाचा: Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला यंदा 5 तासांहून अधिक काळाचे चंद्रग्रहण, राखीचा सण साजरा करता येणार का?
चंद्र लाल का दिसतो
पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. या स्थितीत पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून वाकून चंद्रापर्यंत पोहोचतो. यामुळे केवळ लाल-केशरी रंगाची किरणे चंद्रापर्यंत पोहोचतात आणि चंद्र तांबूस-लाल रंगाचा दिसतो. यालाच 'ब्लड मून' असे म्हटले जाते. मात्र हे आंशिक ग्रहण असल्याने चंद्राचा पूर्ण भाग या रंगात दिसणार नाही, केवळ बहुतांश भागच झाकला जाईल.
ग्रहण पाहण्यासाठी काय आवश्यक
चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज नसते. उघड्या डोळ्यांनीही हे ग्रहण सुरक्षितपणे पाहता येते. मात्र दुर्बीण किंवा छोटी टेलिस्कोप वापरल्यास अनुभव अधिक चांगला होतो. ज्या भागांतून हे ग्रहण दिसणार आहे, तेथील नागरिकांनी स्वच्छ आकाश आणि क्षितिजाकडे मोकळी दृष्टी असलेली जागा निवडावी, असा सल्ला खगोलशास्त्रज्ञ देतात.
पुढील मोठे ग्रहण कधी
यानंतरचे पूर्ण चंद्रग्रहण 31 डिसेंबर 2028 ते 1 जानेवारी 2029 या कालावधीत होणार असून, त्याला 'न्यू इयर ब्लड मून एक्लिप्स' असे संबोधले जात आहे. तोपर्यंत खगोलप्रेमींना या आंशिक ग्रहणावरच समाधान मानावे लागणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2026 12:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

