Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला यंदा 5 तासांहून अधिक काळाचे चंद्रग्रहण, राखीचा सण साजरा करता येणार का?

यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी, म्हणजेच २८ ऑगस्ट २०२६ रोजी आंशिक चंद्रग्रहण लागणार असून त्याचा एकूण कालावधी पाच तासांहून अधिक असणार आहे. मग राखी पौर्णिमेचा सण साजरा होणार का? घ्या जाणून

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला यंदा 5 तासांहून अधिक काळाचे चंद्रग्रहण, राखीचा सण साजरा करता येणार का?
Raksha Bandhan and Grahan Occur on the Same Day

यंदा रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण  28 ऑगस्ट 2026 रोजी, शुक्रवारी साजरा होणार आहे. योगायोगाने याच दिवशी आंशिक चंद्रग्रहण (Partial Lunar Eclipse) लागणार असून, त्याचा एकूण कालावधी पाच तासांहून अधिक राहणार आहे. यामुळे भाऊ-बहिणींच्या नात्याचा रक्षाबंधनाचा सण यंदा साजरा करता येईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र खगोलशास्त्रीय माहितीनुसार हे ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने राखी बांधण्यावर आणि सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत.

 28 ऑगस्टच्या चंद्रग्रहणाची वेळ काय?

खगोलशास्त्रीय माहितीनुसार, हे आंशिक चंद्रग्रहण 27-28 ऑगस्ट 2026 च्या रात्री सुरू होऊन पुढे काही तास चालणार आहे. ग्रहणाचा एकूण  कालावधी सुमारे 5 तास 38 मिनिटांचा असेल, तर प्रत्यक्ष आंशिक ग्रहणाचा कालावधी सुमारे 3 तास 18 मिनिटांचा राहणार आहे. या ग्रहणाचा कमाल टप्पा भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळच्या सुमारास येईल.

ग्रहणा दिवशीही साजरा होणार रक्षाबंधनाचा सण?

हिंदू धर्मपरंपरेनुसार, एखाद्या ठिकाणाहून ग्रहण प्रत्यक्ष दिसत असेल तरच तेथे सूतक काळ आणि इतर धार्मिक नियम लागू होतात. 28 ऑगस्टचे ग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळच्या टप्प्यात होणार असल्याने, त्यावेळी भारतात चंद्र क्षितिजाखाली असेल आणि हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे भारतात सूतक काळ लागू होणार नाही आणि रक्षाबंधनाचा सण नेहमीच्या पद्धतीने, कोणत्याही वेळेच्या बंधनाशिवाय साजरा करता येईल.

रक्षाबंधन कोणत्या दिवशी?

रक्षाबंधन हा सण दरवर्षी हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. ही तारीख इंग्रजी कॅलेंडरनुसार दरवर्षी बदलते आणि साधारणपणे ऑगस्ट महिन्यात येते. यंदा ही पौर्णिमा 28 ऑगस्ट 2026 रोजी असल्याने रक्षाबंधन याच दिवशी साजरे होणार आहे. नक्की वाचा: Raksha Bandhan 2026: 28 ऑगस्टला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, पौर्णिमा तिथी आणि सणाचे महत्त्व. 

चंद्रग्रहण आणि सण यांचा योगायोग आल्यास नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक असते. मात्र खगोलशास्त्रानुसार ग्रहणाचा परिणाम केवळ त्या भागांवर होतो जिथून ते प्रत्यक्ष दिसते. भारताबाहेरील अमेरिका, पॅसिफिक क्षेत्र आणि आसपासच्या भूभागांतून हे ग्रहण दिसण्याची शक्यता आहे. भारतात मात्र या काळात दिवस असल्याने नागरिकांनी सणाच्या तयारीबाबत चिंता करण्याचे कारण नाही.

(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2026 11:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).