सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Fold लॉंच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

अशाप्रकारे हा फोन भारतात उपलब्ध होणारा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन बनला आहे. कंपनीने यावर्षी फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा हा फोन शोकेस केला होता.

Samsung Galaxy Fold (Photo Credits: Twitter)

गेले कित्येक आठवडे प्रतीक्षा असणारा सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, गॅलेक्सी फोल्ड (Samsung Galaxy Fold) आज भारतात लॉन्च झाला. हा फोन भारतात उपलब्ध होणारा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असल्याने या फोनचे महत्व अधिक आहे. कंपनीने यावर्षी फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा हा फोन शोकेस केला होता. सुरुवातीला या फोनच्या डिझाइनवर जोरदार टीका झाली होती, तसेच त्याला स्क्रीन ब्रेकडाउनच्या समस्येचा सामनाही करावा लागला होता. यामुळेच एप्रिल ऐवजी हा फोन आज सादर केला गेला. सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड 12 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया गॅलेक्सी फोल्डमध्ये काय खास आहे आणि कंपनी लॉन्च ऑफरमधील कोणते फायदे प्रदान करणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्डवर ऑफर -

कंपनी हा फोन 1,64,999 रुपये किंमतीत लॉन्च केलेल्या लॉन्च ऑफरसह प्रदान करणार आहे. या फोनसह गॅलेक्सी प्रीमियर सेवा, वन-ऑन-वन असिस्टेंस, एक वर्षाचे अपघाती नुकसान संरक्षण आणि एक-वेळ विनामूल्य स्क्रीन बदलण्याची ऑफर देत आहे. यासह, सॅमसंग प्रत्येक गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोनसह विनामूल्य गॅलेक्सी बड हेडफोन देखील देत आहे. फोनची प्री-बुकिंग 4 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 20 ऑक्टोबरपासून वितरण सुरू होईल.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड वैशिष्ट्ये - 

गॅलेक्सी फोल्ड दोन डिस्प्लेसह येते. यामध्ये एक सपाट स्क्रीन आहे जी फोनच्या समोर आहे आणि दुसरी स्क्रीन आतील बाजूस एक फोल्डेबल डिझाइनसह आहे. फोनचा फ्रंट डिस्प्ले 6.6 इंचाचा आहे जो 840 x 1960 पिक्सल रेझोल्यूशन आणि सुपर एमोलेड डिस्प्लेसह आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 21: 9 आहे. फोनमध्ये उपस्थित असलेल्या दुसरा डिस्प्ले 7.3 इंचाचा आहे. हा डिस्प्ले इन्फिनिटी फ्लेक्स डायनॅमिक AMOLED पॅनेलसह आहे.

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 16-मेगापिक्सल प्राथमिक सेन्सरसह, 12-मेगापिक्सलचा दुय्यम सेन्सर आहे. फोनचा तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे, जो टर्शिअरी सेंसर येतो. फोनच्या फ्रंटमध्ये 10 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या कव्हरवर तुम्हाला 10-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देखील मिळेल. 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजसह उपलब्ध असणारा हा फोन, मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करत नाही. फोनमध्ये ऑक्टा-कोर एसओसी प्रोसेसर आहे. ऑपरेटिंग सिस्टम सॅमसंगच्या वन यूआय वर अँड्रॉइड 9 पाईवर आधारित आहे. फोनमध्ये 4,380mAh ची बॅटरी आहे.