Samsung India Layoffs: सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये होणार नोकरकपात; कंपनी भारतामधील 9 ते 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

गेल्या काही तिमाहींमध्ये, सॅमसंगच्या रिटेल, मार्केटिंग आणि व्यवसाय विकास संघातील 30 हून अधिक उच्च अधिकारी त्यांच्या नोकऱ्या सोडून इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये सामील झाले आहेत.

(Photo Credits: Official Website)

Samsung India Layoffs: भारतात सॅमसंगसाठी दररोज नवीन आव्हाने उभी राहत आहेत. कंपनी केवळ बाजारपेठेतील आपली पकड गमावत नाही तर अंतर्गत अनेक गंभीर समस्यांना तोंड देत आहे. सॅमसंगच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. चेन्नईतील सॅमसंगच्या कारखान्यात सुरू असलेल्या संपाचा सणासुदीच्या काळात कंपनीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. आता बातमी येत आहे की, कंपनी कर्मचाऱ्यांनाही काढून टाकणार आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, सॅमसंगच्या व्यवस्थापनाने भारतातील कंपनीची परिस्थिती आणि पुनर्रचनेबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय संघाला दक्षिण कोरियाला बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी व्यवस्थापन भारतातील 9-10 टक्के कर्मचाऱ्यांना एक्झिट दाखवू शकते.

कंपनी तिच्या विक्री, विपणन आणि ऑपरेशन विभागातील 200 कर्मचारी कमी करू शकते. याशिवाय कंपनी आपल्या संरचनेतही बदल करत आहे, ज्यामुळे अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनाही नोकरी गमवावी लागू शकते. बाजारातील घसरणीमुळे सॅमसंगने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सध्या भरती थांबवली असून, अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांवर भरती केली जात नाही. सूत्रानुसार, सॅमसंग ऑफ-रोल कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी करू शकते.

डिसेंबर 2022 च्या तिमाहीत शाओमीला पराभूत केल्यानंतर, सॅमसंग पुन्हा एकदा 2023 मध्ये गेल्या वर्षी भारतातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी बनली. मात्र, मार्केट रिसर्च फर्म आयडीसी काउंटरपॉइंट आणि कॅनालिसच्या मते, एप्रिल-जून 2024 तिमाहीत व्हॉल्यूमच्या बाबतीत सॅमसंग तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. सॅमसंगच्या स्मार्टफोन शिपमेंटमध्ये 15.4 टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीचा व्हॉल्यूम मार्केट शेअर 12.9 टक्क्यांवर आला आहे. यामुळे, आयडीसी डेटानुसार तिमाही आधारावर मूल्य बाजारातील हिस्सा 23 टक्क्यांवरून 16 टक्क्यांवर घसरला.

चेन्नईतील सॅमसंगच्या कारखान्यात सुरू असलेल्या संपाचा कंपनीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या काळात टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिनचे उत्पादन विस्कळीत होत आहे. शाओमी आणि व्हीवो  सारख्या ब्रँड्सशी आक्रमक स्पर्धा आणि ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांशी असलेले विवाद सॅमसंगसाठी मोठे आव्हान बनले आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधील किमतींमध्ये मोठी तफावत, कमी नफा आणि स्टॉक उपलब्धतेतील अनिश्चितता यासारख्या कारणांमुळे किरकोळ विक्रेते नाखूष आहेत. (हेही वाचा: IIT Bombay Placements: आयआयटी बॉम्बेचे प्लेसमेंट सत्र संपन्न; केवळ 75% लोकांना मिळाल्या नोकऱ्या, किमान वार्षिक पॅकेज 4 लाखांवर घसरले)

काही मोठ्या सेल्स आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह्जने कंपनी सोडल्यामुळे सॅमसंगच्या अडचणीही वाढल्या आहेत. गेल्या काही तिमाहींमध्ये, सॅमसंगच्या रिटेल, मार्केटिंग आणि व्यवसाय विकास संघातील 30 हून अधिक उच्च अधिकारी त्यांच्या नोकऱ्या सोडून इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये सामील झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत आणखी अनेक अधिकारी कंपनी सोडू शकतात.