Quick Commerce Sector: ॲमेझॉन करणार क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये प्रवेश; 15 वितरीत केली जाणार ऑर्डर, जाणून घ्या सविस्तर
आता 1-2 दिवसांत डिलिव्हरी प्राप्त करण्याऐवजी त्यांना काही मिनिटांत ऑर्डर केलेला माल हवा आहे. बाजारात क्विक कॉमर्स कंपन्यांचा शिरकाव झाल्याने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा बाजारातील हिस्सा कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे पाहून या कंपन्यांनाही आता त्वरीत वाणिज्य क्षेत्रात येण्याची इच्छा आहे.
भारतात क्विक कॉमर्स सेक्टर (Quick Commerce Sector) वेगाने विस्तारत आहे. आता ग्राहकांना ऑर्डर केल्यानंतर 1-2 दिवस थांबणे आवडत नाही, उलट त्यांना ऑर्डर केलेला माल लगेच हवा आहे. ही मागणी लक्षात घेऊन, ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी ॲमेझॉन इंडिया (Amazon India) आता Blinkit, Swiggy Instamart, Zepto, Flipkart Minutes, BigBasket यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी बाजारात येत आहे. त्यांच्याप्रमाणेच आता ॲमेझॉनही जलद वितरण सेवेत सामील होणार आहे. ॲमेझॉनचे भारतातील 'कंट्री मॅनेजर' समीर कुमार म्हणाले की, ॲमेझॉनची जलद सेवा या महिन्यात बेंगळुरू येथून सुरू होईल. क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये ॲमेझॉन आपल्या सेवेला 'तेझ' नाव देऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.
15 मिनिटांत डिलिव्हरी केली जाईल-
दिल्लीतील एका कंपनीच्या कार्यक्रमात बोलताना कुमार म्हणाले, ‘या जलद सेवेद्वारे, ग्राहक ऑर्डर दिल्यानंतर केवळ 15 मिनिटांत किंवा त्यापेक्षा कमी वेळेत त्यांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तू मिळवू शकतील. क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये आमचा व्यवसाय वाढवण्याचा आमचा उद्देश आहे. कुमार यांनी सांगितले की, बेंगळुरूनंतर देशातील इतर अनेक शहरांमध्येही ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. अहवालानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून यावर काम सुरू होते आणि आता अखेर ही सेवा सुरु होत आहे.
सध्या ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलू लागल्या आहेत. आता 1-2 दिवसांत डिलिव्हरी प्राप्त करण्याऐवजी त्यांना काही मिनिटांत ऑर्डर केलेला माल हवा आहे. बाजारात क्विक कॉमर्स कंपन्यांचा शिरकाव झाल्याने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा बाजारातील हिस्सा कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे पाहून या कंपन्यांनाही आता त्वरीत वाणिज्य क्षेत्रात येण्याची इच्छा आहे. ॲमेझॉनचे भारतात लाखो ग्राहक असल्याचे कुमार सांगतात. यामध्ये प्राइम सदस्यांचाही समावेश आहे. अशा सर्व ग्राहकांना हा सेवेमुळे फायदा होईल. (हेही वाचा: Myntra Refund Scam: ऑनलाइन शॉपिंग कंपनी 'मिंत्रा'ची कोट्यावधी रुपयांची फसवणूक; चोरट्यांनी घेतला रिफंड सिस्टमचा फायदा, जाणून घ्या सविस्तर)
ॲमेझॉन जगातील अनेक देशांमध्ये व्यवसाय करते. पण भारत हा पहिला देश असेल, जिथे कंपनी 15 मिनिटांची डिलिव्हरी सेवा सुरू करणार आहे. मात्र, 15 मिनिटांत कोणत्या वस्तू वितरित केल्या जातील याचा खुलासा झाला नाही. अहवालानुसार कंपनी क्विक कॉमर्समध्ये 1,000-2,000 उत्पादने विकेल. दुसरीकडे, कुमार यांनी ॲमेझॉन कॉन्फरन्समध्ये सांगितले की, ॲमेझॉन 2025 पर्यंत भारतात 20 लाख नवीन रोजगार निर्माण करणार आहे. कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि वितरण सेवा सुधारण्यासाठी हे करेल.