Pune: Bharti Airtel पुण्यात सुरु करत आहे Technology Centre; 500 जणांची होत आहे नोकरभरती, जाणून घ्या सविस्तर

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आपल्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे

Airtel. (Photo Credits: Twitter)

पश्चिम विभागातील डिजिटल सेवांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने, भारती एअरटेल (Bharti Airtel) पुण्यात (Pune) नवीन तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्याचा विचार करत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे 500 डिजिटल अभियांत्रिकी व्यावसायिकांना नियुक्त करेल. या योजनांची पुष्टी करताना, भारती एअरटेलचे मुख्य माहिती अधिकारी प्रदिप कपूर यांनी पीटीआयला सांगितले की, डिजिटल टेल्कोमध्ये रुपांतरीत होण्यासाठी एअरटेल आपल्या इन-हाऊस डिजिटल टॅलेंटमध्ये वेगाने वाढ करत आहे.

यासाठी पुण्याच्या निवडीबाबत कपूर म्हणाले, ‘पुणे हे एक प्रस्थापित आयटी (IT) आणि टेक हब असल्याने, एअरटेलला वाढीसाठी याठिकाणी चांगला वाव आहे.’ पुण्याचे हब हे भारतातील एअरटेलचे चौथे डिजिटल तंत्रज्ञान केंद्र असेल आणि विशेषत: 5G सेवा सुरु होत असताना, डिजिटल सेवा कंपनीकडे वळण्याच्या धोरणाला पाठिंबा देणारे पश्चिमेकडील पहिले केंद्र असेल. कंपनीचे गुडगाव, बेंगळुरू (एअरटेल एक्स-लॅब्स) आणि नोएडा येथे आधीपासूनच डिजिटल तंत्रज्ञान केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये जवळपास 3,000 लोक काम करतात.

‘सिलिकॉन व्हॅली आणि देशांतर्गत स्टार्ट-अप्स व्यतिरिक्त, एअरटेल त्याच्या डिजिटल तंत्रज्ञान हबसाठी IIT, NITS, IIIT सारख्या अभियांत्रिकी संस्थांमधूनही नोकरभरती करत आहे. एअरटेल त्यांच्या बिग डेटा, मशीन लर्निंग, डेव्ह ऑप्स आणि टेक ऑप्स अशा अनेक डोमेनमध्ये नोकरभरती करत आहे. भारतातील 40 टक्के आर्थिक आणि डिजिटल क्रियाकलाप होत असलेल्या डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी गेल्या काही दशकांत 46 अब्ज डॉलरहून अधिक किमतीची गुंतवणूक केल्याचा एअरटेलचा दावा आहे. (हेही वाचा: ISRO ने सतीश धवन अंतराळ केंद्रात केली मानव-रेटेड S200 रॉकेट बूस्टरची यशस्वी चाचणी)

एअरटेलच्या डिजिटल मालमत्तेमध्ये Airtel Thanks App, Wynk Music App आणि Airtel Xstream कंटेंट प्लॅटफॉर्मचा समावेश आहे, ज्यामध्ये 180 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. दरम्यान, भारती एअरटेल आणि जिओच्या उत्तम कामगिरीमुळे मार्च 2022 मध्ये टेलिकॉम ग्राहकांची एकूण संख्या 11669 दशलक्ष पेक्षा जास्त झाली. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आपल्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे. या कालावधीत भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओने मोबाईल फोन तसेच फिक्स्ड लाइन सर्व्हिस सेगमेंटमध्ये नवीन ग्राहक जोडले गेले.