Facebook lay off: मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकचे पालकत्व असणारी कंपनी मेटा करणारटाळेबंदी, अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आजपासूनच जाण्याची शक्यता

फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅपची (WhatsApp) मूळ कंपनी असलेली मेटा प्लॅटफॉर्म (Meta Platforms) निराशाजनक नफा आणि विक्रीतील घसरणीला प्रतिसाद म्हणून खर्चात कपात करण्याचे धोरण आखत आहे.

Facebook | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅपची (WhatsApp) मूळ कंपनी असलेली मेटा प्लॅटफॉर्म (Meta Platforms) निराशाजनक नफा आणि विक्रीतील घसरणीला प्रतिसाद म्हणून खर्चात कपात करण्याचे धोरण आखत आहे. या धोरणाचा प्रमुख भाग म्हणून कंपनी मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी आणि कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आजपासूनच (9 नोव्हेंबर) हे धोरण राबविण्याची शक्यता आहे.

मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचार्‍यांना सप्टेंबरच्या अखेरीस सांगितले की मेटाने खर्च कमी करण्याची आणि कंपनीची पुनर्रचना करण्याची योजना आखली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, मेटा प्लॅटफॉर्म बुधवारपासून काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात करेल. मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ झुकेरबर्ग यांनी मंगळवारी एका अंतर्गत बैठकीदरम्यान शेकडो एक्झिक्युटिव्हजला कामावरून कमी करण्याच्या योजना उघड केल्या. असेही म्हटले जाते की मीटिंग दरम्यान झुकरबर्गने संपूर्ण दोष घेतला आणि सांगितले की कंपनीच्या चुकांसाठी तो जबाबदार आहे. ते पुढे म्हणाले की वाढीबद्दल त्यांच्या अतिआशावादामुळे जास्त कर्मचारी होते.

कंपनीने बर्‍याच कर्मचार्‍यांच्या संख्येची पुष्टी केलेली नाही. गेल्या आठवड्यात एका अहवालात असे म्हटले आहे की मेटा हजारो कर्मचार्‍यांना कंपनी सोडण्यास सांगेल. द वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, मेटा ची नोकरीतील कपात ही Twitter च्या नोकरीतील कपात पेक्षा टक्केवारीच्या आधारावर तुलनेने लहान असू शकते. परंतु नोकऱ्या गमावण्याची अपेक्षा करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या "एका वर्षात मोठ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आजपर्यंतची सर्वात मोठी असू शकते. सध्या, मेटा प्लॅटफॉर्ममध्ये सुमारे 87,000 कर्मचारी आहेत.