Laptops And PCs Will Be Made in India: आता भारतात बनवण्यात येणार लॅपटॉप आणि पीसी; HP, Dell, Lenovo सह 27 कंपन्यांना सरकारने दिली मान्यता
पीएलआय योजनेचा दुसरा टप्पा मे महिन्यात अधिसूचित करण्यात आला होता.
Laptops And PCs Will Be Made in India: देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारद्वारे (Government of India) चालवल्या जाणार्या प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत HP, Lenovo आणि Dell यासह 27 कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे. यानंतर या कंपन्यांना आयटी हार्डवेअरसाठी (IT Hardware) सरकारने आणलेल्या 17 हजार कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारला IT हार्डवेअरमध्ये PLI साठी एकूण 40 प्रस्ताव प्राप्त झाले होते. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
आयटी हार्डवेअरमध्ये पीएलआयचा लाभ घेणाऱ्या कंपन्या भारतात लॅपटॉप, पीसी आणि सर्व्हर यांसारखी उपकरणे तयार करतील. यासाठी सर्व कंपन्यांकडून एकूण 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. वैष्णवच्या वतीने सांगण्यात आले की, 27 पैकी 23 कंपन्या भारतात तात्काळ उत्पादन सुरू करतील आणि उर्वरित चार कंपन्या 90 दिवसांत उत्पादन सुरू करतील. पुढील सहा वर्षांत या PLI योजनेंतर्गत 3.5 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती आणि विक्री होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -World's Fastest Internet: चीनने लाँच केले जगातील सर्वात वेगवान इंटरनेट; अवघ्या एका सेकंदात डाउनलोड होतील 150 चित्रपट)
2 लाखांहून अधिक लोकांना मिळणार रोजगार -
कंपन्यांच्या गुंतवणुकीनंतर सुमारे 50,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि 1,50,000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. पीएलआय योजनेचा दुसरा टप्पा मे महिन्यात अधिसूचित करण्यात आला होता. त्यासाठी 17,000 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले होते, जे पहिल्या टप्प्यापेक्षा दुप्पट होते. यामध्ये कंपन्यांना पूर्वीपेक्षा जास्त प्रोत्साहन देण्यात आले.
पीएलआयचा पहिला टप्पा आयटी हार्डवेअरमध्ये फारसा यशस्वी नव्हता. सरकारला 2500 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळण्याची अपेक्षा होती. मात्र केवळ 120 कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले. काही काळानंतर सरकारने दुसरा टप्पा सुरू केला. ज्यामध्ये सुमारे 58 कंपन्यांकडून गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. याबाबत सरकारने ऑगस्टमध्ये सांगितले होते की, पीएलआयच्या दुसऱ्या टप्प्यात आयटी हार्डवेअरमध्ये 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.